‘शाश्वत विकासासाठी युवा’ संकल्पनेतून सामाजिक प्रबोधन
विविध उपक्रमांना ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद
वरोरा : छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय सुर्ला (बोर्डा) ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबीर नुकतेच आसाळा येथे उत्साहात संपन्न झाले. “शाश्वत विकासासाठी युवा” या संकल्पनेवर आधारित हे शिबीर २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आले.
उदघाटन सोहळा
शिबिराचे उदघाटन डॉ. रामराव बोन्डे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती राजू गायकवाड होते. प्रमुख वक्ते म्हणून आयआयटी (IIT) खरगपूर येथील सूरज भुते यांनी उपस्थित राहून ‘AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) संधी आणि आव्हाने’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आसाळा-पाचगांवच्या सरपंच किरण ढोक, माणिक डुकरे, किशोर डुकरे, राकेश ढोके (पोलीस पाटील) आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य आणि सामाजिक उपक्रम
शिबिरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथील डॉ. भाग्यश्री विरुटकर व त्यांच्या चमूने रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी आणि ॲनिमिया (रक्तक्षय) तपासणी शिबीर यशस्वी केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी रक्तदान केले, तसेच आयुष्मान भारत कार्डही काढण्यात आले. डॉ. रोहिणी आरजू समकुवर यांच्या नेतृत्वात पशुचिकित्सा शिबीर घेऊन जनावरांना जंतनाशक गोळ्या व जीवनसत्त्वांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि श्रमदान
विद्यार्थ्यांनी गावात श्रमदान करून स्वच्छतेचा संदेश दिला, तर स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. गजानन घुमणार यांनी विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे महत्त्व पटवून देत प्रात्यक्षिके घेतली. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनांतर्गत मेश्राम सर यांनी अभ्यासक्रम, पेपर पद्धती आणि मुलाखत प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.
कीर्तन व महिला मेळावा
विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार मांडणारे सत्यपाल महाराज यांचे शिष्य प्रदीपपाल महाराज चौधरी यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिला मेळाव्यात प्रा. पाटील मॅडम यांनी ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डान्स, एकांकिका आणि नकला सादर करून स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रकाश टाकला.
समारोप समारंभ
१ फेब्रुवारी २०२६ रोजी शिबिराचा समारोप झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन दादा घुमणार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निर्मला खडतर, प्रमुख पाहुणे माणिक डुकरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. दिनकर गुरनुले उपस्थित होते. शिबिराचे यशस्वी नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. विनोद कोरडे, सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. निखिता कापसे यांनी महाविद्यालय प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने केले. सानिया सलामे हिने सूत्रसंचालन केले, तर निकिता श्रीरामे यांनी उपस्थितांचे आभार मानले. आसाळा वासियांनी या सर्व उपक्रमांना उदंड प्रतिसाद दिला.


