ग्रामसफाई, कीर्तन आणि महाप्रसादाने गुरुदेव भक्तांचा उत्साह
मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
कुचना : तालुक्यातील कावडी गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा गुरुदेव सेवा मंडळ आणि समस्त ग्रामवासीयांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यात्म आणि समाजप्रबोधनाची सांगड घालत विविध उपक्रमांनी या सोहळ्याची सांगता झाली.
. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक ग्रामसफाईने करण्यात आली, ज्यातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. त्यानंतर देवराव कंडे महाराज यांच्या हस्ते रीतसर घटस्थापना करण्यात आली. दुपारी गावातील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला बचत गटातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सातपुते मॅडम आणि सय्यद मॅडम यांनी महिलांच्या समस्यांविषयी मार्गदर्शन करत त्यांचे प्रबोधन केले.
![]()
भक्ती आणि प्रबोधनाचा संगम
सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ह.भ.प. सौ. किरण वैद्य यांच्या कीर्तनातून समाजजागृतीचा जागर करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातून भव्य रामधून दिंडी काढण्यात आली, ज्यामध्ये परिसरातील असंख्य भजन मंडळी सहभागी झाली होती. त्यानंतर ह.भ.प. शरद वैद्य महाराज यांच्या मधुर वाणीतून ‘काल्याचे कीर्तन’ पार पडले. प्रख्यात गायक त्र्यंबक जाधव यांनी सादर केलेल्या ‘भजन संध्या’ कार्यक्रमाने भाविकांना मंत्रमुग्ध केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे, शंकर पारखी, देवराव तोडासे यांची प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके संचालन चिंतामण सरवर यांनी केले. सोहळ्याच्या शेवटी भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष रुपेश पोटे, संदीप मुसळे, मंगेश जगताप, पांडुरंग सोनुने, सुनील पोटे, राजू सिडाम यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.


