Home सामाजिक चिमुकल्यांच्या कलेतून उभा केला शाळेसाठी निधी

चिमुकल्यांच्या कलेतून उभा केला शाळेसाठी निधी

374

आसाळा गावकऱ्यांचा जिल्हा परिषद शाळेसमोर नवा आदर्श !

विद्यार्थ्यांच्या कलेवर जमा झालेली रक्कम शाळेच्या रंगरंगोटीसाठी सुपूर्द

वरोरा : आजच्या काळात जिथे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची घटती संख्या आणि सोयीसुविधांचा अभाव ही चिंतेची बाब ठरत आहे, तिथे वरोरा तालुक्यातील आसाळा येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून एक अनोखा आणि प्रेरणादायी पायंडा पाडला आहे. आपल्या पाल्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा वापर करून गावकऱ्यांनी चक्क शाळेच्या इमारतीसाठी निधी जमा केला असून, त्यातून आता शाळेचे रूप पालटणार आहे.

.       आसाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीसाठी आणि रंगरंगोटीसाठी सरकारी निधीची वाट न पाहता गावकऱ्यांनी एक युक्ती लढवली. गावात आयोजित एका पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने शाळेतील चिमुकल्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य आणि नाटकांचे सादरीकरण ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमात मुलांच्या बहारदार कामगिरीवर खुश होऊन उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना मोठ्या प्रमाणात बक्षिसे आणि आर्थिक रक्कम दिली.

.       विशेष म्हणजे, ही मिळालेली रक्कम मुलांनी स्वतःसाठी न ठेवता किंवा पालकांनी न घेता, “आमच्या शाळेचा विकास व्हावा” या भावनेतून पूर्णपणे शाळेच्या व्यवस्थापनाकडे सोपवली आहे. ही जमा झालेली रक्कम आता शाळेच्या इमारतीची देखभाल आणि रंगरंगोटीसाठी वापरली जाणार आहे.

आमची शाळा जिल्ह्यात प्रथम येणारच !”
यावेळी ग्रामस्थांनी केवळ पैसाच दिला नाही, तर “आमची शाळा तालुक्यातच काय तर संपूर्ण जिल्ह्यात गुणवत्तेत प्रथम आली पाहिजे,” असा ठाम निर्धार व्यक्त केला. या कार्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि संपूर्ण गावकऱ्यांनी एकजुटीचे दर्शन घडवले आहे.

.       लोकसहभागातून शाळेचा कायापालट करण्याच्या या आसाळा मॉडेलचे सध्या संपूर्ण वरोरा तालुक्यात कौतुक होत असून, इतर गावांसाठी हा एक आदर्श वस्तुपाठ ठरला आहे.

error: Content is protected !!