एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराचे उद्घाटन
विसापूर येथे राबविण्यात येणार विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम
बल्लारपूर : राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे समाजाशी प्रत्यक्ष जुळून घेण्याचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन मा. ॲड. निलेश चोरे यांनी केले. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ,बल्लारपूर आवार (महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल ) यांच्या तर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय निवासी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे शिबिर शारीरिक शिक्षण महाविद्यालय, विसापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
. ‘पाणलोट क्षेत्र विकासाद्वारे शाश्वत विकास व पर्यावरण संवर्धन’ या संकल्पनेवर आधारित हे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत विसापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे उद्घाटन 28 जानेवारी रोजी ॲड. निलेश चोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराअंतर्गत विसापूर परिसरात विविध सामाजिक, पर्यावरणपूरक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले होते. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक ॲड. निलेश चोरे, आवाराचे समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त, कार्यक्रम अधिकारी श्रुतिका राऊत, तसेच दीपिका उमरे उपस्थित होते.
. मार्गदर्शन करताना ॲड. निलेश चोरे म्हणाले की, मोबाईल फोनच्या वाढत्या वापरामुळे माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय सेवा योजना शिबिरे विद्यार्थ्यांना समाजाशी प्रत्यक्ष जोडून घेण्याची महत्त्वपूर्ण संधी देतात. जनमाध्यमांचा उपयोग काळाची गरज असली तरी आपल्या आजूबाजूच्या लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे तितकेच आवश्यक आहे.
. अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेश इंगोले यांनी विद्यार्थिनींना समाजाचा एक घटक म्हणून आपली कर्तव्ये ओळखून ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचे व योग्य आदर्श निवडण्याचे आवाहन केले. डॉ. वेदानंद अलमस्त यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक संबंध यांमध्ये समतोल कसा साधावा यावर मार्गदर्शन करत या शिबिरातून विद्यार्थिनींना नवे अनुभव व ज्ञान मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
. कार्यक्रम अधिकारी श्रुतिका राऊत यांनी प्रास्ताविकातून सात दिवसीय शिबिराच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन सहप्राध्यापिका अपेक्षा पिंपळे यांनी केले तर सहायक कार्यक्रम अधिकारी दीपिका उमरे यांनी आभार मानले. याप्रसंगी सहायक प्राध्यापक तोयेश नागपुरे, नेहा जिवतोडे तसेच सर्व प्राध्यापकवृंद व विद्यार्थिनी उपस्थित होते.


