रोटरी क्लब, इनरव्हील क्लब आणि टाटा कॅन्सर केअर फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम
वरोरा : जागतिक कर्क दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब वरोरा, इनरव्हील क्लब वरोरा आणि टाटा कॅन्सर केअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा शहरात भव्य मोफत आरोग्य तपासणी व कॅन्सर रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर बुधवार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत श्रीमती इंदिरा गांधी रोडवरील डॉ. विवेक तेला हॉस्पिटल येथे पार पडणार आहे.
. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध प्रकारच्या आरोग्य चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने रक्त तपासणी, रक्तदाब, यकृत, किडनी, मधुमेह कावीळ आणि एचआयव्ही यांसारख्या महत्त्वाच्या चाचण्यांचा समावेश आहे. तसेच कॅन्सर निदानाच्या दृष्टीने तोंडाचे आजार, थायरॉईड, स्तनांचे आजार आणि स्त्रियांच्या मासिक पाळीशी संबंधित समस्यांची विशेष तपासणी केली जाणार आहे.
. या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख म्हणून डॉ. विवेक तेला जबाबदारी सांभाळत आहेत. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश डोंगरवार, सचिव राहुल पावडे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्राजक्ता डोंगरवार आणि सचिव संध्या बारई यांच्यासह दोन्ही क्लबचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.
. वाढत्या कॅन्सरच्या धोक्याकडे लक्ष देताना, वेळेवर निदान झाल्यास हा आजार बरा होऊ शकतो, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वरोरा शहर व परिसरातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी व नोंदणीसाठी ९८६०४६४८०१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे


