वलनी गाव महाराष्ट्रात आदर्श ठरेल – आमदार सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी शिक्षणातच नाही, तर क्रीडा, कला, संस्कृती आणि स्पर्धा परीक्षा अशा प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करून ‘चॅम्पियन’ बनावे, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर जिल्ह्यातील वलनी येथे आयोजित तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुनगंटीवार म्हणाले की, “केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे म्हणजे शिक्षण नव्हे. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून जग समजून घेण्याचे आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचे ज्ञान मिळवावे, हेच खरे शिक्षण आहे.” या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव द्यावा आणि आत्मविश्वासाचे नवे पंख लेवून यशाच्या दिशेने झेप घ्यावी, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
. वलनी हे छोटेसे गाव असूनही, ग्रामस्थांनी या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी केलेली व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध आहे. हे गाव भविष्यात प्रगतीचे शिखर गाठून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श गाव ठरेल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी समस्त ग्रामस्थांचे मनस्वी अभिनंदन केले.


