१० पैकी ७ जागी काँग्रेसचा गुलाल ; भाजपची भिसी अन् चिमूरमध्येच लाज राखली!”
बड्या नेत्यांचा ‘पावर’ मतदारांनी उतरवला !
मुकेश जिवतोडेच्या नेतृत्वात भद्रावती शिवसेनेची मुसंडी
चंद्रपूर : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने अनपेक्षित मुसंडी मारत भारतीय जनता पक्षाला मोठा हादरा दिला आहे. जिल्ह्यातील १० पैकी ७ नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदावर काँग्रेसने ‘दणदणीत’ विजय मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले. विशेष म्हणजे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला असून, जिल्ह्याच्या राजकारणात ही काँग्रेसची मोठी ‘मॅजिक’ मानली जात आहे.
![]()
. सकाळी १० वाजेपासून जिल्ह्यातील १० नगर परिषदा आणि भिसी नगर पंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच काँग्रेसने अनेक ठिकाणी आघाडी घेतली होती. आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे वर्चस्व असलेल्या बल्लारपूर मतदारसंघात भाजपने आपली पूर्ण ताकद लावली होती, मात्र निकाल भाजपसाठी अत्यंत निराशाजनक ठरला. बल्लारपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या अल्का वाढई यांनी भाजपच्या रेणुका दुधे यांचा केवळ ९६ मतांनी पराभव केला. वाढई यांना १३ हजार ९४६ तर दुधे यांना १३ हजार ८५० मते मिळाली. मूल नगरपालिकेतही काँग्रेसच्या एकता समर्थ यांनी २ हजार ८१ मतांच्या फरकाने भाजपच्या किरण कापगते यांना पराभूत करत आपला विजय निश्चित केला.
![]()
. ब्रह्मपुरी नगरपालिकेत काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, येथे योगेश मिसार यांनी ९ हजार ५७३ मतांच्या विक्रमी फरकाने भाजपचे सुयोग बाळबुधे यांचा पराभव केला. राजुरा येथेही काँग्रेसचे अरुण धोटे २ हजार ७३३ मतांच्या फरकाने विजयी झाले, तर वरोरा येथे काँग्रेसच्या अर्चना ठाकरे यांनी भाजपच्या माया राजूरकर यांचा २ हजार ७८५ मतांनी पराभव केला. नागभीड नगरपालिकेत काँग्रेसच्या स्मिता खापर्डे यांनी २ हजार २२४ मतांनी विजय मिळवला. नव्याने स्थापन झालेल्या घुग्घुस नगरपालिकेतही काँग्रेसने बाजी मारली असून दीप्ती सोनटक्के ३४६ मतांनी विजयी झाल्या आहेत.
दुसरीकडे, भाजपला केवळ चिमूर नगरपालिकेत आपले अस्तित्व टिकवता आले, जेथे गीता लिंगायत ६५४ मतांनी विजयी झाल्या.
![]()
. भद्रावतीमध्ये मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात शिवसेना (शिंदे गट) चे प्रफुल्ल चटकी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा ८२९ मतांनी पराभव करत विजय मिळवला. तर भाजपचे अनिल धानोरकर तिसऱ्या स्थानावर राहत त्यांचा दारुण पराभव झाला. गडचांदूरमध्ये मात्र मतदारांनी धक्कादायक निकाल दिला असून, भाजपचे बंडखोर अपक्ष निलेश ताजने २ हजार ६२३ मतांनी विजयी झाले आहेत. भिसी या एकमेव नगर पंचायतीत भाजपचे अतुल पारवे ५२१ मतांनी विजयी झाले.
. केवळ नगराध्यक्षच नव्हे, तर नगरसेवक पदाच्या संख्येतही काँग्रेसने मोठी झेप घेतली आहे. जिल्ह्यातील एकूण २४८ नगरसेवक जागांपैकी तब्बल १४० जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपला ७२ जागांवर समाधान मानावे लागले, तर उर्वरित जागांवर शिंदे शिवसेना (१४), ठाकरे शिवसेना (०९), राष्ट्रवादी अजित पवार (०७), वंचित (०४), बसप (०१), शरद पवार राष्ट्रवादी (०१) आणि १६ अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे आणि आमदार देवराव भोंगळे या सर्वच दिग्गज नेत्यांसाठी हा निकाल राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे.


