Home सामाजिक आदिवासी गोंड गोवारी जमाती तर्फे गायगोधन व ढाल पुजेची सांस्कृतिक परंपरा आजही...

आदिवासी गोंड गोवारी जमाती तर्फे गायगोधन व ढाल पुजेची सांस्कृतिक परंपरा आजही कायम

564

भद्रावती : घोडपेठ येथून जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गायगोधन व ढाल पूजा करण्यात येते. ऐतिहासीक व सांस्कृतिक वारसा लाभलेली ही गायगोधन व ढाल पुजा येथील आदिवासी गोंड गोवारी जमाती तर्फे आजही तितक्याच श्रध्देने व पारंपारिक पध्दतीने साजरी केली जाते. यंदा बुधवारी बलिप्रतिपदेला या गायगोधन व ढाल पुजेचे आयोजन करण्यात आले आहे.

.      परिसरातील चपराडा, चालबर्डी, घोट, निंबाळा, हेटी, लोणारा (गोंड), लोणारा (पारखी), कचराळा, चपराडा, मानोरा, मोहबाळा व ईतर अशा जवळपास १० ते १२ गावांमधील कोपाल (गायी राखणारा) आपल्या गायी गायगोधन पुजेसाठी याठिकाणी घेवून येतात. अंदाजे चारशे वषपिक्षाही जुनी असलेली व सांस्कृतिक वारसा लाभलेली परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू आहे असे जाणकार सांगतात.

.       भद्रावती तालुक्यातील निंबाळा, घोट, हेटी व चालबडीं ही गावे घोडपेठ पासुन उत्तरेस चार किमी अंतरावर आहेत. या गावांमध्ये बहुतांश आदिवासी गोंड गोवारी जमातीचे लोक राहतात. गायी राखणे हा गोंड गोवारी जमातीच्या लोकांचा पारंपारिक व्यवसाय असल्याने हे लोक गायींची तितक्याच भक्तिभावाने पूजा करून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.

.      दिपावलीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतीपदेला गायगोधन व ढाल पूजेचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सकाळी घरी गायींची पूजा केली जाते. त्यानंतर सार्वजनीक पुजेसाठी गायींना गायगोधनाचे पटांगणावर आणले जाते. या पटांगणावर साधारणतः पंचवीस ते तीस टोपले शेणापासुन एक मोठी भुरसी बनविण्यात येते. गायगोधन पुजेमध्ये या भुरसीला अनन्यसाधारण महत्व आहे. या भुरसीमध्ये एक अंडे व कोंबडीचे लहान जिवंत पिल्लू ठेवण्यात येते. पिलाचे धड शेणामध्ये दाबलेले असते व मानेचा भाग खुला ठेवण्यात येतो. तसेच अंदाजे एक फुटाच्या अकरा काड्यांचे अंडे व पिल्लाच्या सभोवती कुंपण करण्यात येते. या काड्या पाच प्रकारच्या झाडांच्या असतात. यावर गुलाबी रंगाची रिबीन गुंडाळून एखाद्या सुवासिनीची ओटी भरतात त्याप्रमाणे खणा नारळाने भुरसीची ओटी भरण्यात येते.

.        यावेळी आदिवासी गोंड गोवारी जमातीतील लोक जमातीचे दैवत असणाऱ्या ढालीचे पुजन करतात. वीस ते पंचवीस फूट लांबीच्या काठीवर लाकडी पाटा बसवुन ढाल तयार केली जाते. यात एक ढाल ही चार मुखी जी माता रायताड जंगो चे प्रतीक अर्थात स्त्री रुपाची असते, तर दुसरी ढाल ही दोन मुखी जी धर्मगुरू पहांदि पारी कुपार लिंगो चे प्रतिक अर्थात पुरुष रुपाची असते.

.        वरील प्रमाणे दोन्ही ढालीला आश्विन दशमीला गोंगो (पुजा) करून आखरावर जिथे गायगोधन तयार करून खिल्ला मुठवा पेन ची पुजा करतात. तसेच जेव्हा हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी पूजन होते त्याच्या पहिल्या दिवशी आदिवासी गोंड गोवारी जमातीमध्ये महिषासुर (बोदालपेन)/ भेसासुर, खैरदाई /मातामाय, ठाकूर देव या देवी देवतांची आणि आपल्या पूर्वजांची जे की पेनकारण (उतरण) केलेले पूर्वज यांची मुठपुजा करून गावातील गायींना गोधनावरून चालवून त्यांना खिल्ला मुठवा देवाचे दर्शन घडवण्याची परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे, म्हणून या दिवशी एक उत्सव साजरा करण्याची परंपरा व रिवाज पडला आहे. म्हणून आजही आदिवासी गोंड गोवारी जमात माता रायताड जंगो व पहांदी पारी कुपार लिंगो च्या प्रतिकात स्त्री आणि पुरुष रुपात अर्थात (सल्ला व गांगरा) ढाली पुजतात. यांना जंगो लिंगो लाठी गोंगो असेही म्हणतात. तसेच आजच्या दिवसापासून आदिवासी गोंड गोवारी जमातीमध्ये देव माई हा धार्मिक मुठपुजाचा सण येईपर्यंत या दोन्ही ढाली ची मानता करण्यात येते. यानंतर गायगोधन पुजेला सुरूवात होते. आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या प्रथेनुसार आधी चारही गावांच्या शिवारांची (सीमेची) व शिवारामध्ये असलेल्या देवांची पूजा करण्यात येते. या पूजेला ‘शिव बांधणे’ असे म्हणतात. त्यानंतर पटांगणा शेजारी असलेल्या आदिवासी गोंड गोवारी जमातीचे आराध्य दैवत असलेल्या वाघोबाच्या मुर्तीची पुजा करण्यात येते. आदिवासी परंपरे नुसार पुजा करुन व नारळ फोडून भुरसीची पुजा करण्यात येते. यानंतर अंडे व जिवंत पिल्लू असणा-या भुरसीवरून कळपाने गायींना सोडण्यात येते.

.      नंतर पिल्लू व अंडे भुरसीबाहेर काढण्यात येते. पण अंडे व पिल्लू यांना इजा झालेली नसते. अंडे व पिल्लू यांना इजा होऊच शकत नाही असा येथील लोकांचा दावा आहे. गुरांना वन्यप्रान्यांपासुन त्रास होवू नये, गुरे रानात हरवू नयेत, गुरांना जादूटोणा होवू नये, त्यांचे रक्षण व्हावे व कोणतेही संकट वारंवार येवू नये.

error: Content is protected !!