भद्रावती : “सेवा परमो धर्मः” या तत्त्वावर कार्यरत असलेला रोटरी इंटरनॅशनल हा केवळ सेवाभावी संस्था नसून जागतिक सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणत आरोग्य, संस्कृती आणि समाजसेवेचा संगम साधण्यासाठी रोटरी क्लब भद्रावतीने यावर्षी ‘रोटरी क्रीडा महोत्सव’ आणि ‘रोटरी दिवाळी उत्सव मेला’ या दोन प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन केले असून हे दोन्ही उपक्रम २२ ते २८ ऑक्टोबरदरम्यान तालुका क्रीडा संकुल, भद्रावती येथे होणार आहेत.
. “रोटरी क्रीडा महोत्सव” हा आजच्या डिजिटल युगात तरुणांना मोबाईल आणि इंटरनेटच्या आहारी जाण्यापासून दूर ठेवून खेळाच्या माध्यमातून तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनशैलीकडे नेणारा प्रयत्न आहे. बॅडमिंटन, कॅरम, बॉडी बिल्डिंग, टेबल टेनिस, व्हॉलीबॉलसारख्या विविध खेळांच्या माध्यमातून नेतृत्वगुण, संघभावना आणि व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. रोटरी क्लबने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की या महोत्सवात सहभागी व्हा, बक्षिसासाठी नव्हे तर तंदुरुस्ती आणि आनंदासाठी खेळा.
. क्रीडा महोत्सवानंतर “रोटरी उत्सव दिवाळी मेला” हा संस्कृती, स्वावलंबन आणि महिला सक्षमीकरणाचा उत्सव म्हणून भरविण्यात येणार आहे. या मेळाव्यात स्थानिक महिला बचत गट व लघुउद्योजकांना त्यांची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळणार असून, हस्तनिर्मित फराळ, पणत्या, पर्यावरणपूरक वस्तू आणि स्थानिक हस्तकला यांचा समावेश असलेले स्टॉल्स लावले जाणार आहेत. यासोबत लोककला, संगीत आणि पारंपरिक मनोरंजनाचे कार्यक्रमही होणार आहेत.
. या मेळाव्यातून जमा होणारा निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यविषयक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या मेळाव्यातील प्रत्येक खरेदी ही समाजसेवेला हातभार लावणारी ठरेल. रोटरी क्लब भद्रावतीचा हा दुहेरी उपक्रम सिद्ध करतो की समाजसेवा केवळ देणग्यांपुरती मर्यादित नसून ती आनंद, खेळ, संस्कृती आणि एकतेच्या माध्यमातूनही करता येते. या दोन्ही उपक्रमांत कुटुंब, मित्रमंडळी व सहकाऱ्यांसह सहभागी व्हा आणि “एकत्र खेळूया, आनंद साजरा करूया, समाजाच्या विकासासाठी एक पाऊल पुढे टाकूया.” असे रोटरी क्लबने आवाहन केले आहे.


