आरोग्य शिबिरात 400 ग्रामस्थांनी घेतला लाभ
वरोरा : वन्यजीव सप्ताह २०२५ अंतर्गत वनपरिक्षेत्र वरोरा मार्फत संपूर्ण परिक्षेत्रात विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा समारोप टेमुर्डा येथील वन चेतना केंद्रात आरोग्य शिबिर आयोजित करून करण्यात आला.
. सेवन स्टार हॉस्पिटल नागपूर आणि वनविभाग चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात सुमारे ४०० ग्रामस्थांनी तपासणीचा लाभ घेतला. कान, नाक, घसा, ईसीजी, मूत्रविकार आणि स्नायू ताकदीची तपासणी तसेच औषधांचे वाटप करण्यात आले.
. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा विद्यालय, टेमुर्डा येथील विद्यार्थी आणि ग्रामस्थांना सीपीआरविषयी माहिती वैद्यकीय अधिकारी कैलास शिकारे यांनी दिली. त्यांनी सीपीआरचे प्रात्यक्षिक सादर करून वनविभाग कर्मचाऱ्यांना प्राथमिक प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले.
. प्रास्ताविकात वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांनी वन्यजीव सप्ताह २०२५ विषयी माहिती देऊन वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच वनविभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही उपस्थितांना दिली. वैद्यकीय अधिकारी गणेश पाटेकर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत तुळशीचे रोप देऊन करण्यात आले.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश चंदेल यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन बोधे यांनी केले. हा कार्यक्रम विभागीय वन अधिकारी राजन तलमले आणि सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे आणि त्यांच्या कार्यसंघाने यशस्वीरीत्या पार पाडला.
. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्षेत्र सहायक चांभारे (टेमुर्डा), क्षेत्र सहायक लोणकर (शेगाव), क्षेत्र सहायक राठोड (वरोरा), वनरक्षक करकाडे, वनरक्षक बम्हनाथ, वनरक्षक माहुलकर, वनरक्षक पेंदोर तसेच वनमजूर वरोरा परिक्षेत्र यांनी विशेष परिश्रम घेतले.


