महिलाना अधिक संधी !
भद्रावती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जलद गतीने पार पाडण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने हाती घेतली. त्या दृष्टीने राज्यातील नगराध्यक्ष सोडत नुकतीच पार पडली. त्या अनुषंगाने वॉर्ड निहाय अनुसूचित जाती, जमाती, महिला पुरुष, सर्वसाधारण, ओबीसी आदी उमेदवारांची सोडत आज दिनांक ८ ऑक्टोबर रोजी नगर परिषद सभागृहात पार पडली. उपविभागीय अधिकारी वरोरा संदीप भस्के व मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांचे प्रमुख उपस्थितीत वॉर्ड निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.
. एकूण चौदा प्रभाग व २९ सदस्य संख्या असलेल्या नगरसेवकांच्या सोडतीत महिलाना अधिक संधी मिळाली. एकूण १५ जागी, प्रसंगी नगराध्यक्ष म्हणून सुद्धा महिला उमेदवार नशीब आजमावू शकतात. त्यामुळे विशेषतः महिला मध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
. अनुसूचित जाती महिला ३, जमाती १, सर्वसाधारण महिला ७, व नागरिकांचा मागास प्रवर्ग ४ तर उर्वरित १४ सदस्यातून अनुसूचित जाती ३, अनुसूचित जमाती १, सर्वसाधारण ६, नागरिकांचा मागास प्रवर्ग ४ असे एकूण २९ संख्याबळ असलेल्या सदस्यांचे आरक्षण विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिक यांचे समक्ष काढण्यात आले.
. सोडतीची अधिकृत प्रक्रिया शांततेत पार पडली. आता सर्व राजकीय पक्ष व इच्छुकाना प्रतीक्षा आहे. ती निवडणूक जाहीरनाम्याची, निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध होताच भद्रावती शहरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. मात्र सोडतीमुळे वॉर्ड निहाय चित्र स्पष्ट झाल्याने पक्षांतर्गत उमेदवार निवडीचे आराखडे बांधायला सुरवात झाली आहे.


