वरोरा : लोकशिक्षण संस्था, वरोडा अंतर्गत लोकमान्य महाविद्यालयतील राष्ट्रीय सेवा योजना,इतिहास व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवारला लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. तानाजी माने (राज्यशास्त्र विभाग प्रमुख, लोकमान्य महाविद्यालय,वरोरा) होते. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते डॉ. माने यांनी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले सार्वजनिक उत्सव व त्यातून स्वातंत्र्य चळवळीसाठी निर्माण झालेली संघटनशक्ती, टिळकांच्या चतु:सूत्रीतील स्वराज्य हे साध्य तर स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार हे साधने आहे व ही चतु:सूत्री भारताच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे, असे मत याप्रसंगी मांडले तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या निवडक विचारावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. शास्त्री यांनी “लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक”, टिळकांची जहालवादी भूमिका व ग्रंथसंपदा यावर मार्गदर्शन केले. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील वास्तविकता मांडली.
. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रवींद्र शेंडे तर आभार डॉ. श्रीकांत पुरी यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


