नागभीड : गोंडवन विकास संस्था नागभीडचे संस्थापक सचिव स्वर्गीय जयसिंग जनवार गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
. प्राचार्य देविदास चिलबुले व पर्यवेक्षक युवराज ईडपाचे यांनी स्व .ज. स. जनवार गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले.तसेच सर्व कर्मचारी वृंदांनी गुरुजींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
. या प्रसंगी आदरांजली वाहतांना प्राचार्य चिलबुले यांनी गुरुजींच्या कार्यकर्तृत्वा विषयी सांगत संस्थापक सचिव यांनी संस्थेच्या रुपाने लावलेल्या कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड, जि. चंद्रपूर, कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वासाळा, आरमोरी जि. गडचिरोली, कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अमिर्झा ता. जि. गडचिरोली तसेच कर्मवीर वस्तीगृह वासाळा व राजेंद्र वस्तीगृह अमिर्झा या रोपट्यांचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे आणि त्यामध्ये ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थीं ज्ञानार्जन करीत असून अनेकांनी आपल्या आयुष्याचे सोने कले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र रविंद्र जनवार हे त्याच धेयाने व विचाराने गुरुजींचा वारसा पुढे नेत असुन त्यांच्या कल्पक नेतृत्वात आज संस्था नावारूपाला आली आहे ही खरी तर गुरुजींचीच पुण्याई आहे. म्हणून आपण सर्व कर्मचारी वर्ग सुखी, संपन्न व आनंदी आयुष्य जगत आहोत याची जाणिव ठेवून प्रत्येकाने कर्तव्याशी तसेच संस्थेप्रती प्रमाणिक राहात शाळा – महाविद्यालयाचा व संस्थेचा उत्कर्ष साधावा, हीच ख-या अर्थाने गुरुजींना आदरांजली ठरेल असे विचार व्यक्त केले.
. पर्यवेक्षक ईडपाचे यांनीही गुरुजींच्या या ज्ञान यज्ञात प्रामाणिकपणा व अथक प्रयत्नांची आहुती देत त्यांच्या स्वप्नपुर्ती साठी आपण सारे कटीबद्ध राहू या असे आवाहन केले. छोटेखानी स्वरुपात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रा. देवानंद प्रधान यांनी केले तर प्रदीप खोब्रागडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.


