Home सामाजिक गांधी तीर्थ स्वच्छ शाळा परीक्षण समितीची कर्मवीर विद्यालयाला भेट

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा परीक्षण समितीची कर्मवीर विद्यालयाला भेट

972

नागभीड : विद्यार्थी जीवनात मिळालेली संस्काराची शिदोरी आयुष्यभर पुरत असते. योग्य संस्कारांनी खरा माणूस घडत असतो.अनेक चांगल्या सवयीं बरोबरच स्वच्छते विषयी तो जागृत व्हावा, स्वच्छता हा प्रत्येकाचा श्वास व्हावा, स्वच्छतेतूनच समृद्धीचा मार्ग जातो ही गोष्ट विद्यार्थी दशेतच त्याच्या मनावर बिंबवल्या जावी या उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव द्वारा दरवर्षी राज्यस्तरीय स्वच्छ शाळा प्रतियोगितेचे आयोजन करण्यात येते.

.    यावर्षी या स्पर्धेत राज्यभरातून 46 शाळांची निवड झाली असून यात चंद्रपूर जिल्ह्यातून दोन शाळा पात्र ठरले आहेत. त्यात कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड चा समावेश असून नुकतीच अंतिम परीक्षणासाठी गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेचे राज्य समन्वयक गिरीश कुलकर्णी यांनी आपले सहकारी चंद्रशेखर पाटील आणि संजय जाधव यांचे सह विद्यालयास भेट दिली.

.      वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाबाबत जाणून घेण्याच्या उद्देशाने आयोजित विद्यार्थी संवाद समारंभात राज्य समन्वयक गिरीश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. व्यक्तिगत तथा सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगतानाच कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या वेडापासून दूर राहण्याची आवाहन केले. भारताचे तुम्हीच खरे आधारस्तंभ आहात तेव्हा स्वच्छतेचा हा वसा आयुष्यभर जोपासावा असे सांगितले.

.      याप्रसंगी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यशाळा प्रमुख युवराज इडपाचे, कनिष्ठ महाविद्यालयीन प्रमुख देवानंद प्रधान व गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता 2024 – विद्यालयाच्या समन्वयिका रजनी चिलबुले यांनी मान्यवर पदाधिकाऱ्यांचे यथोचित स्वागत करीत त्यांना परीक्षणासाठी योग्य ते सहकार्य केले. संवाद स्वच्छतेचा या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयिका रजनी चिलबुले यांनी केले तर शरयू दडमल यांनी मान्यवर पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वृंद व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!