रमजान ईदने दिला एकात्मतेचा संदेश

15

कोरपना : अल्लाहताअलाच्या प्रति आभार व्यक्त करणारा अरबी भाषेतील ईदचा खास मंत्र जपत सोमवारी सकाळी मुस्लिम बांधवांनी घरातून पहिले पाऊल टाकले आणि त्यानंतर बिबी येथील इंतजामीया ईदगाह मध्ये ईद-उल-फित्रचे सामुदायिक नमाजपठण करून पवित्र रमजान महिन्यास निरोप दिला. बिबी येथील कब्रसथानमधील ईदगाह मध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास ईद-उल-फित्रचे मुख्य नमाजपठण झाले. त्यानंतर परिसरात दिवसभर पारंपरिक पद्धतीने रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. देशात सर्वत्र शांतता नांदावी, सर्व संकटे नष्ट होऊन राष्ट्रीय एकात्मता कायम राहण्यासाठी खास दुआ पठण झाले. सकाळी ईदची नमाज अदा करण्यात आली.

.      नमाजपठणापूर्वी धर्मगुरूंचे प्रवचन खतीब-बो-ईमाम मस्जीद ए आला हजरत शहाबाज तहसीनी यांनी नमाजपठणाचे नेतृत्व केले.ईद-उल-फित्रच्या नमाजपठणाबाबत माहिती दिल्यानंतर साडे आठ वाजता नमाज पठणास सुरुवात झाली. नमाजपठण संपताच मौलाना यांनी ईद-उल-फित्रच्या अरबी भाषेतील खुतबाचे वाचन केले. नंतर दुआ पठणाचा कार्यक्रम झाला.त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’ केले.

शिरखुर्म्याने स्वागत                                                                                                                                                                              ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणा-या व्यक्तींना पाहुणचार म्हणून ईदचा खास मेनू शिरखुर्मा देण्यात आला. गोडधोड पदार्थांबरोबरच बिर्याणी, पुलावचा आस्वादही अनेकांनी घेतला.लहानग्यांना मोठ्यांकडून ‘ईदी’ देण्यात आली. रमजानचे कठीण उपवास पूर्ण करणा-या बालकांचे खास कौतुक झाले. ईदनिमित्त नातेवाइकांच्या भेटीगाठी, ईदमिलन आदी कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. राजकीय कार्यकर्त्यांतर्फे ठिकठिकाणी फुलांचे वाटप करण्यात येत होते. ईदगाह मध्ये हबीब शेख, शकील शेख, गौस सिद्दीकी, शादीक शेख, रहीम शेख, अक्रम शेख, वसीम शेख यांनी सर्व मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.