Home सामाजिक काटेरी प्रवास करीत रेश्मिताने गाठली अखेर यशाची पायरी

काटेरी प्रवास करीत रेश्मिताने गाठली अखेर यशाची पायरी

1004

रेश्मिताचा रडवेल्या डोळ्यातील संघर्ष

स्पर्धा परीक्षेतील यशोगाथा

आनंद मेश्राम

 नागभीड : कुटुंबातील आर्थिक परिस्थिती आणि जीवघेणा संघर्ष, दररोज होणारी ससेहोलपट, जगायचं आहे म्हणून नुसतं जगणं, आस ठेऊन जगणे, मनाच्या इच्छा आकांक्षा मारून जिद्दीने श्रमाने उभे राहण्याचा प्रयत्न करणारी नवेगाव हुंडेश्वरी येथील रेश्मिता गुरनुले हिने काटेरी प्रवास करीत अखेर न्यायालयात निवड यादीत अंतिम पात्र ठरलेली.

.      घरी एकूण पाच बहिणी, पाठचा लहान भाऊ, चार बहिणीचे आईने कसेबसे राबराब राबून लग्न केले. बाबा बारा वर्षापासून मानसिक विकलांग झाल्यामुळे रात्रंदिवस जिल्हा रुग्णालयातच भरती राहणारे, महिन्यासाठी औषधोपराचा हजारोहून अधिकचा खर्च, बालपणापासून वडिलांची माया मिळालीच नाही, दोन एकर शेतात विहीर असून डिमांड भरूनही विद्युत जोडणी मिळत नाही म्हणून बाबांनी दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोन महिने खाजगी दवाखान्यात राहून चार-दोन लाख रुपये कर्ज घेत त्यांचे जीवन लग्न झालेल्या मुलीने वाचविले.

.    आपण शिकून कुठेतरी जॉब करावा म्हणून ती एका साध्या गावात जाऊन पोलीस प्रशिक्षण केले, पण कोरोना कालखंडामुळे तेही पाचसहा महिन्यात अर्धवट सुटलेले आणि नंतर मात्र पैशाच्या अडचणीमुळे तिला कायमचं घरात राहावं लागलं. मुलगी म्हणून चार भिंतीच्या आणि तालुकास्तरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेली ती रेष्मिता दररोज दैनंदिन जगण्याचा संघर्ष करीत होती. अशातच लाचारीच्या जगण्यात पाचशे-हजार रुपये कुटुंबाला आधार होईल म्हणून जिल्हा परिषद शाळेत मैत्रिणीसोबत शिकवायला जाऊ लागली. पण पुढे चालून तेही पैसे मानधन शिक्षक देईना, सातत्याने दोन वर्ष मुलांना शिकवणे दररोज शेतीच्या कामावर मजुरीला जाणे, रोजगार हमीची कामे, मिळेल ते काम करत स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती शोधू लागली. पाच-सहा परीक्षा दिल्या. परीक्षा फॉर्म भरायलाही पैसे नाही. परीक्षेला जायला बस तिकीटला तरी कुठून आणणार. जणू तिचं लाचारीच जग सुरू होतं. कुठलेही मार्गदर्शन नाही. स्पर्धा परीक्षेला ती बसलेली. घरात साधा मोबाईलही नाही. कसाबसा मोबाईल मिळाला तर रिचार्ज मारायला पैसे नाही. youtube वर काही व्हिडिओ पाहून अभ्यास करू लागली. चार दोन ओळखीच्या लोकांकडून पुस्तक मिळवून ती वाचू लागली. डोळ्यात तिच्या पाणी असायचे. आणि ती जीवनाची गाणी घडविण्याचा प्रयत्न करीत होती. वनविभागाची स्पर्धा परीक्षा आणि चक्क आश्चर्य. ती चांगल्या गुणांनी आलेली. मात्र देव देतो दैवं नेतो” तिला शारीरिक चाचणीला समोर जायचे होते. रात्रंदिवस तीन महिने श्रम करून अगदी धावचाचणी पासून सगळे कौशल्य पारंगत झालेली आणि एके दिवशी पायाचा अपघात, बरेच दवाखाने केले पण ती धावू शकत नव्हती. तरीपण त्या लंगड्या पायांनी ती धाव चाचणीत उभी राहिली. बारा मिनिटात तीन किलोमीटर अंतर पार करायचं होतं. पण ती तिची शेवटची धाव… सतरा मिनिटे लागली. खूप खूप रडली ती. अखेर तिला या निवड यादीतून बाहेर व्हावं लागलं. दवाखान्यात जायलाही पैसे नाहीत. पाय बरा करावा तरी कसा? कोणी दिलेले ट्यूब मलम लावून पुढे आलेल्या चारपाचही स्पर्धा परीक्षा, पुन्हा स्वप्न बघू लागली आणि न्यायालयातील स्पर्धा परीक्षेत तिला पुन्हा गुणांक छान लाभलेलं. कुठलीही शिकवणी, मार्गदर्शन नाही. मात्र हजारो मुलांच्या या स्पर्धेत मुलाखत चाचणी अशा बाबीतून यश मिळेलच याची शाश्वती नव्हती. तिचे मन हिरमुसलेले असायचे. ती इतरही स्पर्धा परीक्षेच्या तयारी करू लागली. घरी मार्गदर्शन करणारे कोणीही नाही. आणि अशातच कळलं, ती न्यायालयात निवड यादीत अंतिम पात्र ठरलेली.

.      तिला विश्वासच बसेना. आनंद की दुःख ती रात्रभर ढसाढसा रडत होती. मात्र तिच्या जगण्याचा हा संघर्ष आता तिच्या मनातल्या आंकांशाला बळ देणारा आहे. तसेच इतर स्पर्धकांनाही स्पर्धेच्या जीवनात जिद्दीने लढावयास लावणारा नक्कीच आहे. खरंतर तिच्या या परिश्रमाला जिद्दीला लाखलाख शुभेच्छा…

error: Content is protected !!