क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंतीचे औचित्य
अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती
सिंदेवाही : गोंडीयन समाजाची धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक स्थिती अत्यंत दयनीय व चिंताजनक आहे. म्हणून स्वच्छ व सुंदर विचारधारेच्या कोया पुनेम जाणून घेण्याकरिता, ढासळलेले मनोबल मजबूत करण्याकरिता, तसेच समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला थांबविण्याकरिता जागतिक गोंड सगामंदी शाखा वासेरा यांचे वतीने २७ व २८ मार्च ला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती निमित्ताने दोन दिवसीय गोंडवाना महासंमेलन आयोजित केले असून यासाठी अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
. क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे जयंती दिनाचे औचित्य साधून जागतिक गोंड सगा मांदी शाखा वासेरा तालुका सिंदेवाही यांचे वतीने २७ व २८ मार्च रोजी घेण्यात येत असलेल्या दोन दिवसीय गोंडवाना महासंमेलन मध्ये पहिल्या दिवशी धार्मिक विधी आणि मातापूजन करून सायंकाळी ६ वाजता क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेची गडचिरोली येथील गोंडी ढेमसा ग्रुप यांचे नृत्यासह भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येत आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता वडसा येथील गोंडियान सामाजिक कार्यकर्ते तथा कृषी पर्यवेक्षक अमित केराम यांचे हस्ते गोंडवाना महासंमेलनाचे उदघाटन पार पडणार आहे.
. यावेळी अध्यक्ष म्हणून सावली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, सावलीचे नायब तहसीलदार किशोर मडावी, तर क्षेत्र सहाय्यक शिवरतन उसेंडी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात येत आहे. दुपारी ११ वाजता गोंडवाना साहित्यिक, तथा विचारवंत नंदकिशोर नैताम, गोंडी विचारवंत शशिकांत मडावी, गोंडीयान संस्कृती विचारवंत रमेश कोरचा, गोंडी धर्म प्रचारक संपत कन्नाके, इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. रात्री ८ वाजता विदर्भ स्तरीय गोंडी नृत्य स्पर्धा आयोजित केली असून या गोंडवाना महासंमेलन करिता परिसरातील असंख्य आदिवासी समाजाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा पोलिस पाटील देवेंद्र तलांडे तथा जागतिक गोंड सगामंदी शाखा वासेरा येथील सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.


