पतीचा वर्धा नदीत झाला होता मृत्यू
बैंक ऑफ इंडिया बामणी तर्फे मदत
बल्लारपूर : तालुक्यातील दहेली येथील शेतकऱ्याच्या वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला होता. यामुळे त्या शेतकऱ्यांचा कुटुंबावर आघात झाला. घरातील कर्ता अचानक गेल्याने पत्नी हतबल झाली.या विवंचनेत ती बामणी येथील बँक ऑफ इंडिया शाखेत आर्थिक अडचण दूर व्हावी म्हणून गेली. बँकेतील अधिकाऱ्यांनी तिच्या पतीच्या खात्याची चौकशी केली.पंतप्रधान सुरक्षा विम्याचा लाभ मिळू शकतो,असे आश्वस्त केले. अखेर शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला पी.एम.सुरक्षा विम्याचा आधार मिळाला. ही किमया बामणी येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या अधिकाऱ्यांनी साधली.
. बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथील शेतकरी विठोबा कार्लेकर यांचा वर्धा नदी पात्रात १८ नोव्हेंबर २०२४ रोजी दुर्दैवी बुडून मृत्यू झाला. यामुळे त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले.यातून सावरण्यासाठी त्याची पत्नी रुपा विठोबा कार्लेकर बँक ऑफ इंडिया बामणी येथील शाखेत पतीच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम काढण्यासाठी गेली. त्यावेळी बँक कर्मचारी कार्तिक वराटे यांनी विठोबा कार्लेकर यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या रक्कमेचा तपशील तपासला. वर्षभरातील व्यवहाराची पाहणी केली.त्यावेळी विठोबा कार्लेकर यांच्या नावाने बँक खात्यासोबत केवळ २0 रुपये किमतीचा पी.एम.सुरक्षा विम्याचा हप्ता कपात करण्यात आल्याचे दिसून आले. त्यावेळी बँक अधिकारी आशिष भेंडारे यांचेशी चर्चा करून शेतकरी अपघात विम्याचे प्रकरण निकाली काढण्याची प्रक्रिया सुरु केली. सदर प्रकरणाची प्रक्रिया तीस दिवसात पूर्ण करून विम्याची २ लक्ष रूपये बँक खात्यात जमा केले.
. बँक अधिकारी निखिल भोगे, अनवेशकुमार बडोले, आशिष भेंडारे व कार्तिक वराटे यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे रूपा विठोबा कार्लेकर यांना पी. एम. सुरक्षा विम्याचा आधार मिळाला.


