विसापूर येथे तहसील कार्यालय तर्फे विशेष शिबीर
अर्गिस्टक अंतर्गत फार्मर आयडी साठी सूचना
बल्लारपूर : केंद्र व राज्य सरकार लोकहितासाठी अनेक योजना राबवत आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी अर्गिस्टक अंतर्गत फार्मर आयडी ही महत्वकांक्षी योजना आहे.सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी योजनांचा समावेश आहे. शासनाचे धोरण लोकसहभागातून लोककल्याणासाठी आहे, असे प्रतिपादन बल्लारपूर येथील नायब तहसिलदार सतीश साळवे यांनी विसापूर येथे केले.
. बल्लारपूर तहसील व ग्रामपंचायत कार्यालयातर्फे स्थानिक सभागृहात शेतकऱ्यांसाठी अर्गिस्टक अंतर्गत फार्मर आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसिलदार सतीश साळवे, नायब तहसिलदार अजय मल्लेरवार, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, महसूल अधिकारी आरती दुलत, अन्न पुरवठा विभाग निरीक्षण अधिकारी प्राजक्ता सोमलवार, ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते, कृषी सहाय्यक यु.एम.डिकले यांची उपस्थिती होती.
. यावेळी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण करून शिबीराचे उदघाटन करण्यात आले. दरम्यान प्राजक्ता सोमलवार यांनी शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी करण्याबाबत माहिती दिली. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी डिबीटी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे सतीश साळवे यांनी सांगितले. प्रास्ताविक उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी केले. संचालन विद्या देवाळकर यांनी केले. आभार शशिकला जीवने यांनी मानले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.


