सिंदेवाही : ग्रामसभा ही पंचायतराज आणि गावाच्या विकासाचा महत्वाचा दुवा आहे. राज्यघटनेच्या ७३ व्या दुरुस्ती मुळे देशात पंचायतराज पद्धती सुरू झाली. आणि या पंचायतराज पद्धतीने प्रत्येक ग्राम पंचायती मध्ये ग्रामसभा नावाची एक यंत्रणा निर्माण केली आहे. या ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला असून पूर्वीच्या चार ग्रामसभा ऐवजी सहा ग्रामसभा अनिवार्य केल्या असून महिलांच्या ग्रामसभा घेणेही बंधनकारक केल्या आहेत. असे असताना मात्र सिंदेवाही तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायती मधील ग्रामसभेला नागरिकांनी पाठ फिरवली असल्याने ग्रामसभा बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे झाले आहे.
. अलीकडे गावाच्या विकासाबाबत सोशल मीडियावर चवीने चर्चा करून लोकप्रतिनिधीना उपदेशाचे डोज पाजले जातात. मात्र सोशल मीडियावर चर्चा करणारेच ऐन ग्रामसभेच्या दिवशी गैरहजर राहून सभेला दांडी मारतात. त्यामुळे हल्ली प्रत्येक ग्राम पंचायत मधील ग्रामसभा तहकूब करावी लागत आहे. सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत एकूण ५० ग्राम पंचायती कार्यरत असून या ग्राम पंचायती हद्दीत येणारे आणि मतदानाचा हक्क बजावणारे प्रत्येक नागरिक ग्रामसभेचे सदस्य आहेत. गावच्या विकासात ग्रामसभेचे महत्वाचे योगदान असते. ग्रामसभा ही तळागाळातील लोकांचा आवाज स्पष्ट करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. असे असले तरी तालुक्यातील बहुतेक ग्राम पंचायती मध्ये कोरम अभावी ग्रामसभा तहकूब झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
. कोरम अभावी तहकूब झालेली ग्रामसभा ही नंतर काही दिवसांनी घेतली जाते. परंतु नंतर होणाऱ्या ग्रामसभेला ग्रामस्थांच्या संख्येच्या उपस्थितीचे बंधन राहत नसल्याने आणि नियमाप्रमाणे ती ग्रामसभा घेणे बंधनकारक असल्याने ग्रामसभेचा मूळ उद्देशच बाजूला राहत आहे. गावाच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजनेच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केल्या जातो. आणि ग्रामसभेच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करून गावातील विकास कामांवर हा निधी खर्च करण्यासाठी नियोजन करावयाचे असते. त्यामुळे गावातील असंख्य नागरिक ग्रामसभेला उपस्थित राहून गवाकरिता मिळालेला निधी गावातील योग्य कामांवर खर्च करायचा असतो. मात्र असे होत नसल्याने गावाच्या विकासासाठी मिळालेला निधी अनावश्यक ठिकाणी, किंवा अत्यंत गरजेच्या ठिकाणी खर्च केला जात नाही. काम झाल्यानंतर गावातील व्हॉट्स ॲप ग्रुप त्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू करून लोकप्रतिनिधींवर ताशेरे उडविले जातात. परंतु आपल्याला मिळालेल्या अधिकाराची जाणीव करून देण्यात नागरिक कमी पडतात. अनेक गावांमध्ये शंभर नागरिक ग्रामसभेला उपस्थित राहू शकत नसल्यामुळे ग्रामसभा तहकूब करावी लागते. ही बाब चिंतनीय आहे. ग्रामसभेचे महत्व काय आहे, तसेच ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्यबाबत तालुक्यात जनजागृती होणे गरजेचे आहे. गावच्या विकासाच्या प्रक्रियेत ग्रामसभा महत्वाची भूमिका बजावू शकते. त्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेला वेळ देऊन सहभागी होणे गरजेचे आहे.


