नागभीड : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण हे अन्य कुठल्याही शाळेत दिल्या जाणाऱ्या शिक्षणापेक्षा सरस असुन विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतुन संस्कारी व जीवनमुल्यांवर आधारीत शिक्षण दिल्या जाते. त्यांचे सादरीकरण अशा बालक्रिडा स्पर्धांतुन करण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी केले.
. देवपायली येथे पंचायत समिती नागभीड अंतर्गत बाळापुर (बुज) बिटस्तरीय शालेय बालक्रिडा तथा सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन संजय गजपुरे यांच्या हस्ते पार पडले. लेझीम पथकासह कार्यक्रम स्थळी आगमन झाल्यानंतर क्रिडाज्योत प्रज्वलीत करुन या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यात सहभागी बाळापुर (बुज) व मिंडाळा केंद्रातील २१ जि.प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी पथसंचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली.
. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी देवपायली चे सरपंच अरविंद कोहपरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच इंदिरा नवघडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील नवघडे, उपाध्यक्ष मनिषा आटमांडे, बाळापुर चे माजी सरपंच धनराज बावणकर, कृऊबास संचालक धनराज ढोक, ग्रा.पं. सदस्य वैशाली भोयर, ज्योती मडावी, माजी सरपंच लक्ष्मण कोहपरे, दयाराम खेवले, राजु गुरपुडे, जगदीश तिवाडे, अमोल मडावी यांची उपस्थिती होती.
. संमेलनाध्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भंडारे यांनी प्रास्ताविकेतुन स्पर्धेची माहिती देत अतिशय कमी कालावधीत याची तयारी केली असल्याचे सांगत होणाऱ्या त्रुटीबद्दल माफ करण्याची विनंती केली. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात सांघिक व वैयक्तिक क्रीडा तथा सांस्कृतिक स्पर्धेत जि.प.उच्च प्राथमिक शाळा बोंड ने विजेतेपद पटकावले तर देवपायली शाळेला उपविजेतेपद मिळाले. विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या शाळा व विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय क्रीडा सोहळ्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे.
. या संपूर्ण सोहळ्याचे संचालन जिभकाटे यांनी केले. यशस्वितेसाठी संमेलनाचे कार्याध्यक्ष व देवपायली चे मुख्याध्यापक टेमदेव नवघडे यांच्यासह केंद्रप्रमुख भारत बोरकर व प्रदीप मोटघरे, सर्व मुख्याध्यापक, गावातील ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त समिती, शिवछत्रपती मंडळ, ग्रामसंघ, श्री गुरुदेव सेवा मंडळ, मॅा मानकादेवी संस्थान चे सदस्य यांनी सहकार्य केले.


