चार दिवसापासून भटकत होती जंगलात
तिला उपचारार्थ दाखल केले दवाखान्यात
अनेकश्वर मेश्राम
विसापूर : आजघडीला सर्वत्र माणुसकीचा ऱ्हास होताना दिसत आहे. सारेच स्वार्थासाठी धडपडत आहे. जन्मदात्रीला बेवारस सोडले जात आहे. असाच प्रसंग चंद्रपूर – बल्लारपूर राज्य महामार्गावर घडला. एक अनोळखी वृद्ध महिला चार दिवसापासून जंगलात भटकत होती. थंडीने ती कुडकुडत होती. ही बाब एकाच्या लक्षात आली. त्याने तिला उन्ही शाल दिली. एवढेच नाही. तिला मातोश्री वृद्धाश्रम पर्यंत सोडले. मात्र, व्यवस्थापनाने तिला ठेवण्यासाठी नकार दिला. तिची अवस्था पाहून बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. हा प्रसंग म्हणजे ‘त्या’ वृद्ध महिलेच्या मदतीला माणुसकी धावल्याचा आहे. ही किमया इंदुबाई पोटे व दीपक पोटे यांनी केली.
. चंद्रपूर येथून एका ऑटोरिक्षा ने इंदुबाई पोटे व तिचा मुलगा दीपक पोटे बल्लारपूर कडे जात होते. सोमवार (२५) नोव्हेंबर ला सकाळ ७.४५ ची वेळ होती. चंद्रपूर ते बल्लारपूर मार्गावर जंगलात अनोळखी वृद्ध महिला थंडीत कुडकुडत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी ऑटोरिक्षा थांबवला. त्या वेळी एक जण तिला काहीतरी खाऊ घालत असल्याचे दिसले.
. तेव्हा आई व मुलाने आस्थेने विचारपूस केली. ती अनोळखी ७0 वर्षाच्या वृद्ध महिला काहीच बोलण्याच्या मानसिकतेत नसल्याचे लक्षात आले. मात्र, तिला खाऊ घालणाऱ्या व्यक्तीने मागील चार दिवसापासून ती जंगलात बेवारस भटकत असल्याचे सांगितले. कडाक्याच्या थंडीत ती भान हरपून गेल्याने तिचे अवसान गळाले होते. आई मुलाने त्या अनोळखी वृद्ध महिलेला खाऊ घालून विसापूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात आणून सोडले. मात्र, त्या वृद्धेजवळ कोणतेही ओळखपत्र नव्हते. परिणामी त्या वृद्धेची दखल घेतली नाही. व्यवस्थापनाने याची माहिती बल्लारपूर पोलीस ठाण्याला दिली. पोलीस प्रशासनाने तिला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी इंदुबाई पोटे व तिचा मुलगा दीपक पोटे या आईलेकरांनी अनोळखी वृद्ध महिलेला बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून माणुसकी जिवंत असल्याचा परिचय दिला.
असे चित्र सार्वत्रिक दिसून येते गाव असेल, शहर असेल. वृद्ध व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती सर्वत्र आहे. आपल्यातील माणुसकी आटली आहे. एखाद्याचा प्रसंग डोळ्यासमोर आल्यावर, आपण हळहळतो. माणुसकी लोप पावत असल्याचे चित्र उभे ठाकले आहे. ज्या मायबाप सरकारची आशा करतो. तेही अनाथाकडे डोळेझाक करताना दिसते. मतावर डोळा ठेवून योजना आणल्या जात आहे. मात्र, इंदुबाई पोटे व तिचा मुलगा दीपक पोटे यांचे आपुलकीने माणुसकी जपण्याचा प्रसंग सर्वांना प्रेरणादायी आहे. हे दिसून येत आहे.


