विसापूर येथे अमृतमहोत्सवी संविधान वर्षाला प्रारंभ
विसापूर : भारतीय संविधानाचे महत्व अनन्य साधारण आहे. यामध्ये स्वातंत्र्य, समता,बंधुता व न्यायाची संकल्पना मांडली आहे. माणुसकीची शिकवण यात अंतर्भूत आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक समानतेचा अधिकार आहे.मात्र, आजघडीला संविधानाचे महत्व कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान अंमलबजावणी करण्याबाबत धोक्याचा इशारा दिला होता. तो खरा होताना दिसत आहे. नागरिकांनी संविधानाकडे ‘कर्मकांड’ म्हणून पाहू नये, असे प्रतिपादन विसापूर येथील उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी विसापूर येथे संविधान कार्यक्रमात केले.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत कार्यालयात अमृतमहोत्सवी संविधान दिनाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या. यावेळी उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य दिलदार जयकर, शशिकला जीवने, लिपिक संतोष निपुंगे, राहूल टोंगे, अशोक ठुनेकर यांची उपस्थिती होती. दरम्यान लिपिक संतोष निपुंगे यांनी संविधान प्रास्ताविकेची उपस्थितीतांना शपथ दिली.
. ग्रामपंचायत समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मालार्पण करून जिल्हा परिषद हायस्कूल, प्रिर्यदर्शनी कांनव्हेंट,चिंतामणी माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भारतीय बौद्ध महासभा व अन्य सामाजिक संघटनेच्या वतीने मिरवणूक काढून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


