जयभीमच्या घोषाने निनादली चंद्रपूर दीक्षाभूमी
दीक्षाभूमीवर भीमसागर उसळला
68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा
दीपक लडके
चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर नाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या क्रांतिकारी क्षणाची आठवण म्हणून दरवर्षी दोन दिवसीय धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा आयोजित केला जातो. आज बुधवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिधातूकलशाची समता सैनिक दलाच्या पथसंचलनासह शहरातून अस्थी रॅली काढण्यात आली. यावेळी भजंत नागार्जुन सुरई ससाई उपस्थित होते. रॅलीमध्ये मोठ्या संख्येत बोद्ध बांधव सहभागी झाले होते.
. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर १६ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या ऐतिहासिक दिनानिमित्त बुधवारी (दि.१६) जयभीमच्या घोषाने चंद्रपूर दीक्षाभूमी निनादली.
![]()
. शतकानुशतके धार्मिक व्यवस्थेच्या गुलामगिरीत जखडलेल्या शोषित, पीडितांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 15 व 16 ऑक्टोबर १९५६ रोजी समता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा देऊन नवी क्रांती घडविली. त्या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी महामानवाने मनामनात चेतवलेली समतेची मशाल हाती घेत देशविदेशातील लाखोंचा जनसागर बुधवारी दीक्षाभूमीवर अवतरला. ‘जय भीम’ हा क्रांतीचा नारा देत भीम सैनिकांचे जत्थेच्या जत्थे तथागत गौतम बुद्ध आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक झाले.

छायाचित्र- गोलू बाराहाते
. हातात पंचशील ध्वज, डोक्याला निळ्या पट्ट्या, पांढरा पोशाख, उरात भरलेला प्रचंड आत्मविश्वास घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यांमधून लाखो अनुयायी दोन दिवसांपासून महामानवाला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर पोहोचत आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर भीमसैनिकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. सकाळी धम्म ध्वजारोहणासह समता सैनिक दलाच्या सैनिकांनी दीक्षाभूमी परिसरात पथसंचलन व तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेबांना मानवंदना दिली. दिवसभर लाखो अनुयायांनी मुख्य स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेत अभिवादन केले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला अनुयायींचा जनसागर उसळणार होता.
आंबेडकरी साहित्याची थाटली दुकाने : दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायींमध्ये सर्वाधिक भूक असते ती ज्ञान साहित्याची. दीक्षाभूमीवर यंदाही दोनशेच्या वर पुस्तकांची दुकाने लावण्यात आली आहेत. यात बुद्ध, फुले, कबीर, आंबेडकर, पेरियार या सोहळा महापुरुषांवर आधारित पुस्तके आहेत. दरवर्षी महापुरुषांचे विचारधन असलेल्या पुस्तकांतून कोट्यवधींची उलाढाल होते. पुस्तकांच्या स्टॉलवरही दोन दिवसांपासून अनुयायींची गर्दी होत आहे. भारतीय संविधानापासून ते बाबासाहेबांचे लेखन , साहित्य खंड व इतर पुस्तकांची प्रचंड मागणी होताना दिसून येत आहे.


