सिंदेवाही : सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चा स्थापना दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला असून कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवी सरस्वती आणि अहिंसेचे प्रतिक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली.
. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेश डहारे यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली आणि विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे, असा संदेश दिला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सिध्दार्थ मदारे आणि डॉ. रिझवान शेख यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विचारधारेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सेवा, स्वावलंबन आणि राष्ट्रीय ऐक्याच्या मूल्यांची विद्यार्थ्यांच्या मनावर गहिरा ठसा उमटवला. विद्यार्थी प्रतिनिधी सौरभ परसावार आणि निराशा बोरकर यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या जीवनमूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमात छकुली कापगते आणि त्यांच्या समूहाने स्वागतगीत सादर केले. छकीलआणि ममता मोहूर्ले यांनीही गीत सादर करून विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक आणि भावनिक आविष्काराचे दर्शन घडवले.
. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. अमित उके यांनी केली, तर सूत्रसंचालन चेतना अगडे यांनी केले. समारोप सत्रात प्रा. तुकाराम बोरकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


