सिंदेवाही : राज्याचे तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर.पाटील यांचे संकल्पनेतून २००७ मध्ये राज्यात अस्तित्वात आलेल्या म. गांधी तंटामुक्त गाव समित्या आजही कार्यरत असून नुकत्याच झालेल्या वासेरा तंटामुक्त समितीच्या मासिक सभेमध्ये गावातील एकूण आठ प्रकरणाचा योग्य निपटारा करून पिढीताना न्याय देण्यात आला.
. सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत मौजा वासेरा हे ४५०० लोकसंख्या असलेले गाव आहे. गावात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. मात्र काही लोकांचे शेतीच्या जागेवरून, तर काहींचे घरांच्या जागेवरून आपापसात वाद निर्माण झाले. तसेच काही पती पत्नी मध्ये सुद्धा पटेना झाले असल्याने, याबाबत तंटामुक्त समितीकडे न्याय मागण्यासाठी नऊ अर्जदारांनी अर्ज दाखल केले होते. याबाबत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू नंदनवार यांचे पुढाकारातून ग्राम पंचायत कार्यालयात बैठक आयोजित करून सर्व वादी – प्रतिवादी यांना बैठकीला बोलाविण्यात आले. आणि सर्व प्रकरणावर सखोल चर्चा करून काहींच्या प्रकरणात घटनास्थळाची पाहणी करून प्रकरणे मिटविण्यात आली. तसेच पती पत्नीचे दोन प्रकरण सुद्धा निपटारा करण्यासाठी आले. दोन्ही प्रकरणातील महिला घटस्फोट घेण्यासाठी आग्रही होत्या. त्या दोन्ही महिलांना समज देऊन पतिकडे राहण्यासाठी तंटामुक्त समितीने आग्रह केला. मात्र दोन्ही महिला घटस्फोट साठी आग्रही असल्याने त्यांना न्यायालयीन सल्ला देण्यात आला.
. या बैठकीला तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू नंदनवार, निमंत्रक तथा पोलीस पाटील देवेंद्र तलांडे, माजी सरपंच महेश बोरकर, तमुस सदस्य महेंद्र कोवले, सुनिल घाटे, श्रीहरी बोरकर, दिनकर बोरकर, संजय कापकर, तारकांत बोरकर, गिरीश धात्रक, रवींद्र बोरकर, नागेश बंडीवार, अशोक बोरकर , जलील शेख, तलाठी बोमावार, पोलीस विभागाचे विनोद बावणे, वीज वितरणचे पंकज भोयर इत्यादी उपस्थित होते.


