वरोरा : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खेमजई तथा ग्रामस्थ खेमजई यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 3 ते 12 मे पर्यंत खो-खो उन्हाळी शिबिर तथा स्पोकन इंग्लिश वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 110 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 98 विद्यार्थी शिबिराला प्रत्यक्ष हजर होते.
. या शिबिरात खेमजई, साखरा, वरोरा, मोखाळा, नागरी, लोधीखेडा, सोनेगाव, वडगाव, तसेच कोरपना तालुक्यातील पिंपळगाव या नऊ गावचे 98 विद्यार्थी सहभागी झाले होते. शिबिरात वर्ग 6 ते 12 पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होते. शिबिर पूर्णतः निवासी होते. ग्रामिण भागात निवासी स्वरुपाचे दहा दिवसाचे खो-खो चे उन्हाळी शिबिर घेण्याचा हा जिल्ह्यातील पहीलाच प्रयोग होय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी, कौशल्यपूर्ण खेळ खेळता यावा व आत्मविश्वासाने इंग्रजी बोलता यावे यासाठी मौजा खेमजई येथे दहा दिवसांचे खो-खो उन्हाळी शिबिर तथा इंग्लिश स्पोकन वर्ग आयोजित करण्यात आले.
. शिबिराचे उद्घाटन दिनांक 3 मे ला सकाळी दहा वाजता गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वरोरा ज्ञानेश्वरजी चहारे यांच्या हस्ते व पशुधन विकास अधिकारी डॉ. अघडते यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. शिबिरात दहा दिवसात शिबिरार्थीना खो-खो चे कौशल्य व इंग्रजी विषयाची माहिती शिकण्यास मिळाले. शिबिराची सुरुवात सकाळी पाच वाजता व्हायची. सकाळचे सत्र 5 ते 10.30 पर्यंत चालायचे यामध्ये सूक्ष्म व्यायाम, पाच किलोमीटर अंतर धावणे, खो-खो चे कौशल्य आणि खो-खो चा सराव चालायचा. सकाळी 10:30 ते दुपारी 2 ला विश्रांती असायची. दुपारी 2 ते 5.30 पर्यंत गोपाळ गुडधे यांचा इंग्लिश स्पोकन वर्ग चालायचा. सायंकाळी सहा ते नऊ पर्यंत परत रनिंग, व्यायाम व खो खो चे स्कील व सराववर्ग नियमितपणे चालायचा. दुपारच्या सत्रात दुपारी दोन ते पाच या सत्रात गो वीथ स्ट्रक्चर तर्फे इंग्रजी स्पोकन वर्गाचे आयोजन केले जात होते. गोपाळ गुडधे हे नियमितपणे दहा दिवस निवासी राहून वर्ग घेत होते. या वर्गाला साठ विद्यार्थी उपस्थित राहायचे. या अशा महत्वपूर्ण आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिकण्यास मदत झालेल्या या शिबिराचा समारोप दिनांक 12 मे 2024 ला सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला.
. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत खेमजईच्या सरपंच मनीषा चौधरी ह्या होत्या. कार्यक्रमाचे बक्षीस वितरक म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. चंद्रपूर डॉ. अश्विनी सोनवणे हजर होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी पं.स.वरोरा ज्ञानेश्वर चहारे, जिल्हा शिवसेनाप्रमुख चंद्रपूर नितीन मत्ते, उपसरपंच ग्रामपंचायत खेमजई चंद्रहास मोरे, डॉ. गंपावर, पशुधन विकास अधिकारी डॉ. अघडते श्रेणी एक खेमजई, माजी शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव राऊत, केंद्रप्रमुख सागर पाटील शेगाव बु, पावडे दिशा एज्यूपाॅईंट वरोरा, माजी सरपंच रमेश बावणे खेमजई, सदस्य ग्रा.पं. खेमजई रमेश चौधरी, नथ्थू घरत तथा बहुसंख्येने ग्रामस्थ हजर होते.
. बक्षीस वितरक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. अश्विनी सोनवणे जि. प. चंद्रपूर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ही ग्रामीण भागातील मुलगी होती आणि ग्रामीण भागातील मुलांमध्ये कौशल्य व अपार क्षमता लपलेल्या आहेत असे सांगितले. आपण सुद्धा भामरागड येथे कार्यरत असताना अशाच प्रकारचे 200 ते 300 मुलांचे शिबिर आयोजित करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास भर घालण्याचा प्रयत्न केला.
. कार्यक्रमात शिबिरातील बेस्ट बॉईज कॅडेट ऑफ समर कॅम्प 2024 दीक्षांत आडे व भृवेश ठाकरे याचा तर बेस्ट गर्ल कॅडेट ऑफ द समर कॅम्प 2024 प्राची चौधरी व अदिती काळे हीचा ट्राफी देऊन शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) डाॅ. अश्विनी सोनवाने जि.प.चंद्रपुर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. तर बेस्ट ऑफ द बेस्ट कॅडेट ऑफ द समर कॅम्प 2024 कुमार रुद्र नैताम नागरी ठरला.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या शिबिरातील शिबिरार्थी मोनिका तुळशीराम तुमसरे वर्ग आठवा हीने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा अहवाल वाचन या शिबिराचे संयोजक तथा शिबीर प्रमुख संजू श्रावण जांभुळे यांनी केले. शिबिरात सतत दहा दिवस निवासी राहून कुंभारे खो खो नॅशनल पंच, स्वप्निल सायंकार राज्यस्तरीय ॲथलेटिक पंच, बंटी घुगल, पूजा नेवारे, आयुषी मोहूर्ले, धनश्री ताजणे यांनी मार्गदर्शक तथा कोच म्हणून भूमिका पार पाडली.
. या शिबिराला सर्व प्रकारची मदत ग्रामस्थांनी केली. शिबिर निवासी असल्यामुळे त्यांच्या राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची व्यवस्था खेमजई ग्रामवासियांनी केली. कार्यक्रमाचे आभार शिबिरार्थी नियती चौधरी हीने केले.


