Home सामाजिक आता अपंग आणि वयोवृद्ध नागरिकांना घरूनच करता येणार मतदान

आता अपंग आणि वयोवृद्ध नागरिकांना घरूनच करता येणार मतदान

1185

तहसीलदार पानमंद यांनी सभेतून दिली माहिती

सिंदेवाही : येणाऱ्या काही दिवसातच लोकसभा निवडणूक कार्यक्रम सुरू होणार असल्याने निवडणूक पूर्व कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने नुकतीच सिंदेवाही तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची सभा तहसिल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली. यामध्ये ८० वर्षापेक्षा जास्त वय असलेले वयोवृद्ध तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंग असलेल्या नागरिकांना आता घरूनच मतदान करता येणार असल्याची माहिती तहसीलदार संदीप पानमंद यांनी दिली आहे.

.       लोकसभा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम घोषित होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून प्रशासना कडूंन निवडणूकपूर्व कामांचा आढावा घेणे सुरू आहे. यामध्ये याद्या अध्यावत करणे, ईव्हीएम प्रात्यक्षिक करून दाखवणे, यासारखे निवडणूक पूर्व कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने सभा आयोजित करून येत्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ८० वर्षापेक्षा जास्त वय असणारे नागरिक आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्या मतदारांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याबाबतच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल तहसीलदार संदीप पानमंद यांनी सभेमध्ये माहिती दिली. यासाठी संबंधित मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत १२ ड हा अर्ज भरावा लागणार आहे. आणि अर्जामध्ये मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार की घरून मतदान करणार याबाबत पर्याय द्यावा लागणार आहे. त्यावर जिल्हा निवडणूक अधिकारी अंतिम निर्णय घेणार आहेत.

.       घरातून मतदान करताना पारदर्शकता राहावी यासाठी निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष प्रतिनिधी हे उपस्थित राहणार आहेत. ज्या मतदारांना मतदार केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही त्यांचे मतदान वाया जाऊ नये. म्हणून ही सुविधा निवडणूक आयोगाने सुरु केली आहे असे सांगून ज्यांची वयाची १८ वर्ष पूर्ण झाली आहे. परंतु अजून पर्यंत मतदार नोंदणी न केलेल्या विद्यार्थी आणि तरुणांनी मतदार नोंदणी करावे. असे आवाहन तहसीलदार संदीप पानमंद यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार हेमंत तेलंग, मंगेश तुमराम, अन्न निरीक्षक शरद लोखंडे, प्रविण गावंडे, युवराज मेश्राम आणि सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!