उपाययोजना शून्य, नागरिकाचे आरोग्य धोक्यात
व्यथा दुर्लक्षित शहराची भाग – 4
मारोती चाफले
गडचांदूर : औधोगिक नगरी ब्रीद मिळविणाऱ्या गडचांदूर शहर पूर्णतः प्रदूषणाच्या कचाट्यात सापडलेले आहे. सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात प्रदूषणाची तिव्रता प्रचंड वाढली आहे. वायु, जल आणि ध्वनी प्रदूषणाने नागरिकांचे जगणे असह्य झाले असून प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी नगरपरिषदेने त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे.
. उद्योग जगतात अग्रेसर असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट (माणिकगड सिमेंट) कंपनीमुळे येथील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे गडचांदूरकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. तर जड वाहतुकीमुळे फुटलेले रस्ते, कच्च्या रस्यावरील पार्किंग, सिमेंट कंपनी व वाहनांचा धूर यामुळे गडचांदुरात २४ तास वायु प्रदूषण असते. माणिकगड सिमेंट कंपनी ही अगदी शहरालगत असल्यामुळे कंपनीशी संबंधित सर्व बाबीचा शहराशी संबंध येतो.![]()
. कंपनीमध्ये वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून निघणान्या व रस्त्यावरील धुळीमुळे गडचांदूरवासी त्रस्त झाले आहेत. घरात तर गृहिणींना दिवसभर साफसफाई करावी लागते, दारे, खिडक्या बंद असल्या तरी धूळ शिरते कुठून ?, असा प्रश्न गृहिणी करताना दिसतात. रोज कितीही स्वच्छता केली तरी घरातील टाईल्स वर धुळीचे कण आढळतात, हवेतील सिमेंटचे कण बाहेरील वाहनांवरही पडून राहतात. कंपनीच्या सभोवताल वस्तीत व घराच्या छतावर धुळच धूळ साचलेले दिसून येत आहे. कवेलूचा रंग बदलला आहे. यामुळे गडचांदुरवासीयांना मानसीक त्रास सहन करावा लागत आहे.
. माणिकगडच्या वाढीव प्रकल्पामुळे गडचांदूरातील शिक्षक कॉलनीत नागरिकांना वास्तव्य करणे जिकरीचे झाल्याचे नागरिक सांगतात. गडचांदुरातील शेती माणिकगड सिमेंटच्या पुरामुळे नेहमी करपून जात आहे. झाडांच्या पानावर सिमेंटचे कण पडूत झाडांची वाढ खुंटत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे . माणिकगड सिमेंट कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे गडवांदूरकर त्रस्त आहेत. शिक्षक कॉलनीत त्रासामुळे भाडेकरून मिळणे कठीण झाले आहे. कंपनीने घूर नियंत्रणात आणण्यासाठी प्रदूषण नियंत्रण यंत्राचा वापर करायला पाहिजे, तसेच सांडपाण्याची योग्य व्यवस्था करण्यासाठी नगरपालिकेने पाऊले उचलली पाहिजे व भूमिगत गटारांची निर्मिती व्हायला पाहिजे त्यामुळे पर्यावरणाचे व पर्यायाने मानवी आरोग्याचे रक्षण होईल.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात शहरात अस्तित्वात असणाऱ्या सिमेंट कंपनी मुळे जल, वायू, ध्वनी प्रदूषणाचा मारा गडचांदूर शहराला सोसावा लागत आहे. पाण्यामध्ये जीवजंतूची प्रक्रिया होऊन त्यांची संख्या वाढीस लागते. त्याच्या प्रक्रियांमुळे अनेक दूषित दुर्गंधी वायूंची निर्मिती होते व सार्वजनिक आरोग्य बिघडते, जर हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या संपर्कात आले. तर पिण्याच्या पाण्यात जंतूचा प्रादूर्भाव होऊन जलप्रदूषण होते. व त्यामुळे अनेक जीवघेणे आजार होवू शकतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गडचांदूर शहरात विविध प्रकारच्या प्रदुषणाने तोंड वर काढल्याने नागरिकांच्या सरासरी आयुर्मानात घट होत आहे. डोळ्याने दिसत नसले तरी अनेक दूषित कण पाणी व जेवनाच्या माध्यमातून शरीरात जातात काही दूषित परिणाम तर बाह्यांगावर सुद्धा प्रतिकूल परिणाम करतात त्यामुळे नागरिकांच्या सरासरी आयुर्मानात घट होत आहे. यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे.
प्रदूषण मंडळाची कंपनीवर मेहरबानी का ? गडचांदूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा कुठलाही विचार न करता, शहरालगतच सिमेंट कंपनीच्या दुसऱ्या युनिट ला मान्यता देउन प्रदूषण नियंत्रण मंडळ कंपनीवर मेहरबान असल्यामुळे प्रदूषणाबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी असतानाही सिमेंट कंपनीवर कुठलीही कार्यवाही होत नसल्याचे नागरिक बोलतात.

