नागभीड : सत्र २०२२-२३ मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातून गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तथा आदर्श शिक्षक म्हणून पुरुष्कृत ठरलेल्या शिक्षकांचा सत्कार सोहळा रिवार्ड संस्था नागभीड येथे पार पडला.
. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया हे होते तर प्रमुख मार्गदर्शक तथा बक्षीस वितरक म्हणून टविंकल इंग्लिश स्कूल नागभीड च्या प्राचार्य शुभांगी पोहेकर या होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.कृष्णा राऊत, संजय गजपुरे, गुलजार धम्मानी, गणेश तर्वेकर, जहांगीर कुरेशी, सचिन आकुलवार आदी मान्यवरांची विचारपीठावर उपस्थिती होती.
. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका प्राचार्य सुभांगी पोहेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपण गुणवंत झालो म्हणून इतक्यातच खूष होऊ नये, जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे असून तेव्हाच आपण आपले ध्येय गाठू शकतो असे मौलिक विचार व्यक्त केले.
. प्रमुख अतिथी प्रा राऊत यांनी प्रत्येक विद्यार्थी हा सक्षम असतो त्याने आपल्यातील कलागुणांचा योग्य वापर केला तर निश्चितच तो जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो असे मत व्यक्त केले. संजय गजपुरे यानी मार्गदर्शन करताना विद्यार्थी यांनी समाजाचे काही तरी देणे आहे आणि आपण मोठे झाल्यावर ते परतफेड करणे आहे असे सांगितले.तर अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना आमदार बंटी भांगडिया यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना यशाची पायरी ओलांडताना आपले ध्येय कोणते आहे याकडे जाणीवूर्वक लक्ष देऊन वाईट मार्गाला लागू नये असे सांगितले.
. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक म्हणून ठरलेले तालुक्यांतील संजय येरणे व संतोष नन्नावरे यांचा पत्रकार संघ नागभीड वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम पाथोडे यांनी केले. संचालन पराग भानारकर यांनी तर आभार आनंद मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व गुणवंत विद्यार्थी, पालकवर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पत्रकार यांनी मोलाचे सहकार्य केले.