उपसभापती गोविंदा पोडे,मुलगा चैत्यन्य व भाचा उज्वल यांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार
घरी पार्थिव देह आणताच अनेकांच्या अश्रूचा बांध फुटला
चंद्रपूर
. घरातील धार्मिक कार्य पार पाडण्यासाठी अख्खे कुटुंब व नातेवाईक वर्धा – इराई नदीच्या संगमावर गेले. तेथे मोठ्या वडिलांच्या अस्थी विसर्जन कार्यक्रम घेतला. अखेरच्या टप्प्यात घराकडे परतण्याची तयारी केली जात होती. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. वर्धा नदीच्या खोल पाण्यात एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी व मनाला चटका देणारी घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) गावाजवळ वर्धा – इराई नदीच्या संगमावर रविवारी घडली. ‘त्या’ तिघांवर इराई नदीच्या तीरावर सोमवारी अश्रूपूर्ण नयनांनी अखेचा निरोप दिला. यावेळी अनेकांनी अश्रूला मोकळी वाट करून दिली. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पांडुरंग पोडे (४८), त्यांचा एकुलता मुलगा चैतन्य गोविंदा पोडे (१६) व बहिणीचा मुलगा गणेश उर्फ उज्वल रवींद्र उपरे (१८) सर्व रा. नांदगाव (पोडे) ता. बल्लारपूर यांच्या पार्थिवांवर शोकाकुल वातावरणात हजारोंच्या साक्षीने मुखग्नी देण्यात आला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.
. रविवारी पोडे कुटुंबीय घनश्याम पोडे यांच्या अस्थी विसर्जनासाठी वर्धा नदीच्या संगमावर गेले होते.त्या ठिकाणी धार्मिक विधी पार पाडण्यात आला. मात्र ध्यानिमनी नसताना एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये नांदगाव (पोडे) येथील माजी सरपंच, बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती व बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे, चंद्रपूर येथील एलिमिट इन्स्ट्यूट मध्ये अकरावीत शिक्षण घेणारा मुलगा चैतन्य व चंद्रपूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालय मध्ये बारावीत शिक्षण घेणारा भाचा गणेश उर्फ उज्वल उपरे यांचा पाण्यात बुडून करून अंत झाला.
. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शव विच्छेदन करून सोमवारी सकाळी ११ वाजता तिघांचेही मृतदेह घरी आणण्यात आले. त्यानंतर शवपेटीत त्यांचा देह अंत्यदर्शना करिता बाहेर ठेवण्यात आले. दुपारी १ वाजता फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर वर ठेऊन हजारोंच्या संख्येत अंत्य यात्रा काढण्यात आली. दुपारी २.४५ वाजता तिघांच्याही पार्थिवावर इराई नदीच्या तिरावर शोकाकुल वातावरणात शेवटचा निरोप देण्यात आला. यावेळी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. अनेकांनी पोडे कुटुंबिया प्रती शोक संवेदना व्यक्त केली.
मुलगी डाक्टर होण्याचे स्वप्न अधुरे गोविंदा पोडे यांच्या कुटुंबात पत्नी रेणुका,मुलगी मृणाली व मुलगा चैतन्य असे चार जणांचा सुखी परिवार आहे. या दुर्दैवी घटनेत रेणुकाचा आधार पती व मुलगा काळाने हिरवला. याच वर्षी मुलगी मृणालीला गोविंदा पोडे यांनी डाक्टर व्हावी, म्हणून बैतूल येथे शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मुलगा चैतन्यला देखील उच्च शिक्षण देण्याचा मनसुबा केला होता. मात्र अकाली घटनेमुळे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. पिता व पुत्र अचानक काळाने हिरावले आहे. त्याच प्रमाणे त्यांचे नातेवाईक रवींद्र उपरे यांच्या कुटुंबात पत्नी रजनी, मुलगा गणेश उर्फ उज्वल व मुलगी आराध्या असे छोटे कुटुंब आहे. रवींद्र उपरे यांचा मुलगा गणेश उर्फ उज्वल हाच एकमेव आधार होता. तो देखील काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबावर मोठा आघात कोसळला आहे.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सह मान्यवरांनी केले सांत्वन बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे, मुलगा चैतन्य व भाचा गणेश उर्फ उज्वल उपरे यांच्या अकाली मृत्यू बद्दल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, विधान परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले, राजुराचे आमदार सुभाष धोटे, माजी खासदार हंसराज अहिर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर वैद्य, माजी सभापती दिनेश चोखरे, सचिन राजूरकर, काँग्रेसचे नेते घनश्याम मुलचंदानी, रामू तिवारी, जि. प.चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, दीपक जैस्वाल, प्रकाश देवतळे, तहसीलदार डा. कांचन जगताप, संवर्ग विकास अधिकारी अनिरुद्ध वाळके, माजी सरपंच सुभाष ताजने, माजी आमदार संजय धोटे, मुरलीधर गौरकार, माजी सरपंच मोरेश्वर लोहे, माजी सभापती हरीश गेडाम, राजू झोडे आदिनी गोविंदा पोडे यांच्या पत्नी रेणुका व मुलगी मृणाली, रवींद्र उपरे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्याच प्रमाणे गावातील आबाल वृद्ध व मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.

