वासेरा ग्रा.पं. सरपंच आणि पोलीस पाटील यांचे एक पाऊल स्वच्छतेकडे
सिंदेवाही
. अंगात जिद्द, चिकाटी, धैर्य, असेल तर व्यक्ती कोणत्याही पदावर असला तरी त्याचे मोठेपणा न दाखवता काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत असतो. असाच प्रयत्न सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील ग्राम पंचायत सरपंच महेश बोरकर , पोलीस पाटील देवेंद्र तलांडे, यांनी स्वतः हातात झाडू घेऊन गावातील रस्ते झाडून गाव स्वच्छ करण्याचा विडा उचलून गावातील नागरिकांनी आपल्या घराजवळचा परिसर स्वच्छ करावा असा संदेश या माध्यमातून दिला आहे.
. सिंदेवाही तालुक्यातील वासेरा हे साडे चार हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने गावाची व्याप्ती बरीच मोठी असून दिवसेंदिवस गावाची लोकसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी गावाबाहेर असलेल्या महसुली जागेवर अतिक्रमण करून आपला निवारा करून राहत आहेत. गावाचा दर्शनी भाग हा सुबक व आकर्षक आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरून गाव किती सुंदर असेल याची कल्पना करता येते. मात्र बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे गावात आगमन होताच अस्वच्छ रस्ते, रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिगारे, यावरून गावात अवदसा पसरली असल्याचे दिसून येते. त्यामुळे सरपंच महेश बोरकर ,आणि पोलीस पाटील देवेंद्र तलांडे यांनी स्वतः हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ ठेवण्याचा विडा उचलला आहे. गावातील अनेक नागरिक घरी शौचालय असूनही त्याचा वापर न करता उघड्यावर शौचास जात असल्याने रस्त्यावर घान पसरून गावाबाहेरील रस्त्यावर दुर्गंधी पसरत होती. मात्र सरपंच महेश बोरकर, पोलीस पाटील देवेंद्र तलांडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू नंदनवार यांचे पुढाकारात गावातील काही नागरिक घेऊन दररोज पहाटे चार वाजता पासून गावच्या सभोवताल कडक पहारा देत असून उघड्यावर शौचाला बसणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाईचे कडक पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता नागरिकांचे उघड्यावर शौचास जाणे बंद झाले असून गावाबाहेरील रस्ते स्वच्छ आणि सुंदर झाले आहेत. या उपक्रमास गावातील सुज्ञ नागरिक चांगलाच प्रतिसाद देत असून, स्वच्छ आणि सुंदर गाव करण्याचा गावातील पदाधिकाऱ्यांनी विडा उचलला असल्याने गावातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे…

