गावातील तरुणास ३ हजाराचे बोळवण
पंकज रणदिवे
. नेरी
. पळसगांव (पिपर्डा)ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या पर्यटन गेट वरती पर्यटकांना जंगल भ्रमंती साठी जिप्सीचा वापर करण्यात येत आहे. स्थांनिकांना रोजगार मिळावा म्हणून स्थानिक तरुण युवकांना स्वत:ची जिप्सी ताडोबा पर्यटन साठी वापरण्यास प्राधान्य देण्यात आले . मात्र काही श्रीमंत व्यवसायिकानी गावातील तरुणांना लालीपॉप दाखवत स्वत:ची जिप्सी स्थानिकांच्या नावाने खरेदी करून चालविल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने याबाबत स्थानिक नागरिकात असंतोष पसरला आहे.
. ताडोबा प्रशासनाने गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणला जंगल भ्रमंतीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात गावातील नागरींकाना जिप्सी खरेदी, गाईड, जिप्सीचालक म्हणून प्राधान्य दिल्या गेले आहे.अनेक देशी विदेशी पर्यटक आपले बुकिंग करून जंगलात प्रवेश करतात, गावातील सामान्य नागरिकांना सुशिक्षित बेरोजगार यांना जंगल सफारीच्या माध्यमातून रोजगार मिळतो आहे. मात्र यावरही काही श्रीमंत व्यवसायिकांच्या नजरा याकडे लागल्या आहे. कोलारा, नवेगाव, नेवगाव (कोर), अलिझांजा, मदनापुर गेट या गावातील बेरोजगार युवकांना लालीपॉप देत त्यांच्या नावाने जिप्सी खरेदी केल्या तर काही ठिकाणी दुसऱ्यांच्या नावानं जिप्सी आणि चालक भलताच अशी प्रचिती दिसून येत आहे.
. काही युवकांनी मासिक दोन ते तीन हजार रु मानधन घेऊन बाहेरील व्यक्तीच्या जिप्सी आपल्या नावाने चालवीत असल्याचा गंभीर प्रकार गावातील स्थानिक नागरिकांच्या लक्षात येत असल्याने पर्यटन क्षेत्रातील नागरिकांनी या वर आक्षेप घेत काही गावांनी लेखी अर्ज सादर केले आहेत, तर काही ठिकाणी चक्क दारिद्र रेषेखालील असलेल्या तरुणांच्या नावाने जिप्सी घेतल्याचे दिसून येत आहे. असे ग्राम पंचायत व इको समितीला कळविले आहे. त्यामुळे असल्या जिप्सी धारकास प्रमाणपत्र देण्या योग्य होणार नसल्याने प्रमाणपत्र देण्यात ग्राम पंचायतला अडचण येत आहे, असे प्रकार ताडोबा मधील पर्यटन क्षेत्रातील गावामध्ये दिसून येत आहे.
. वास्तविक परिस्थितीत नुसार गावात चौकशी केल्यास खरे चित्र समोर येईल,तेव्हा या गंभीर प्रकारकडे ताडोबा प्रशासनाने लक्ष घालून यावर आळा घालून बनावट मालकाच्या जिप्सीला पर्यटन क्षेत्रात कायमचा प्रवेश नाकारून गावातील तरुणास संधी दिल्यास नक्कीच गावातील तरुणांसाठी रोजगाराचा मोठे साधन निर्माण होऊन त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाहास चांगला फायदा होईल.हे मात्र खरे

