ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात नेत्यांच्या हालचालींना आला वेग

96

सिंदेवाही : आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता प्रत्येक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी विद्यमान तसेच नवख्या इच्छुकांना कामाला लावले असल्याचे दिसून येत असले तरी ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना शह देण्यासाठी राजकीय पक्षात उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याचे दिसून येत असून ब्रम्हपुरी मतदार संघात नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

.       राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार) – आणि शिवसेना (उबाठा) असे मिळून महविकास आघाडी तयार झाली आहे. तर भाजपा – शिवसेना ( शिंदे) – राष्ट्रवादी ( अजित पवार ) मिळून महायुती तयार करून निवडणूक लढणार आहेत. ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघ हा मागील दहा वर्षापासून कांग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिला असून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे या क्षेत्राचे नेतृत्व करीत आहेत. येणाऱ्या काही काळातच विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याची चाहूल सुरू झाली असून खुद्द विजय वडेट्टीवार यांचा क्षेत्रामध्ये दौरा वाढलेला आहे. वडेट्टीवार यांनी विधानसभेच्या तोंडावर अनेक विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा सपाटा सुरू केला असून, घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटप करण्याचा निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू आहे. मुलगी शिवानी वडेट्टीवार यांचे मार्फतीने क्षेत्रातील गावागावात जावून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नोट बुक वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. दुसरीकडे वडेट्टीवार यांना शह देण्यासाठी क्षेत्रात राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असून मागील निवडणुकीत ऐन वेळेवर या क्षेत्रात शिवसेनेला तिकीट देऊन संदीप गड्डमवार यांना वडेट्टीवार यांचे विरोधात रिंगणात उतरविले होते. मात्र त्यांचा पराभव झाला असून संदीप गड्डमवार हे सध्या वडेट्टीवार यांचे सोबत आहेत. भाजप कडून माजी आमदार अतुल देशकर हे सुद्धा विधानसभा क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून मृत व्यक्तींना तसेच आजारी व्यक्तींना आर्थिक मदत करून जनसामान्यांच्या संपर्कात आहेत.

.       भाजप मधून दुसरे उमेदवार म्हणून वसंत वारजुरकर यांच्या नावाची सुद्धा ब्रम्हपुरी क्षेत्रामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या शिवसेना ( शिंदे) कडून मतदार संघात काहीच हालचाली दिसून येत नसल्या तरी अजित पवार गटाकडून मात्र नवघडे आणि निकुरे या दोन उमेदवारांच्या नावाची भक्कम चर्चा सुरू झाली आहे. यापैकी दिवाकर निकुरें यांचे शुभेच्छा बॅनर, पोस्टर सिंदेवाही तालुक्यातील गावागावात झळकले आहेत. नुकतेच अजित पवार गटाचे आमदार तथा राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा सिंदेवाही दौरा अजित पवार गट सुद्धा मागे नाही. हे दर्शवून गेला आहे. बाबा आत्राम यांचे सिंदेवाही दौऱ्यामुळे अजित पवार गटातील कार्यकर्ते यांना स्फूर्ती मिळाली असून त्यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. खोरीप या आंबेडकरी पक्षाकडून अशोक रामटेके यांनी सुद्धा कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आम्ही सुद्धा काही कमी नाही. हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

.       वंचित बहुजन आघाडी कडून अजून पर्यंत कोणाचेही नाव आघाडीवर नसले तरी डॉ. राहुल मेश्राम हे इच्छुक असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. गावागावात नवखे चेहरे गाठी भेटी घेत असले तरी कोणत्याच पक्षात इच्छुकांची भाऊ गर्दी दिसून येत नाही. भारतीय जनता पार्टी वडेट्टीवार यांचे आव्हान पेलण्यासाठी कोणती खेळी करणार आहे. हे येणारा काळच ठरविणार आहे.