Home चंद्रपुर जिल्हा विशेष ‘मुख्यमंत्री बळीराजा योजने’तून वडार शिवपांदन रस्ता सुधारा !

‘मुख्यमंत्री बळीराजा योजने’तून वडार शिवपांदन रस्ता सुधारा !

6

नंदोरीतील शेतकऱ्यांचे आ. करण देवतळे यांना साकडे

‘जनसंवाद’ कार्यक्रमात निवेदन सादर

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी परिसरातील शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सचिन नारायण लांबट यांच्या शेतापासून ते गुलाब विष्णू ताजणे यांच्या शेतापर्यंतचा पांदण रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून थेट प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. नंदोरी येथे आयोजित ‘जनसंवाद’ कार्यक्रमात वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

.       पावसाळा तोंडावर आलेला असताना शेतात जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित उपलब्ध नसल्याने भद्रावती तालुक्यातील नंदोरी परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. नंदोरी ते पानवडाळा या गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा ‘वडार शिवपांदन रस्ता’ पूर्णपणे खचला असून, या रस्त्यावरून चालणेही शेतकऱ्यांसाठी जीवघेणी कसरत ठरत आहे. विशेष म्हणजे ७ मार्च रोजी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात’ तहसीलदार राजेश भांडारकर यांना याविषयी सविस्तर निवेदन देऊनही प्रशासनाने त्याची साधी दखलही घेतलेली नाही. तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या या थंड प्रतिसादामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर बुधवार, १० जून रोजी नंदोरी येथील ‘जनसंवाद नंदोरी-मुधोली मंडळ’ कार्यक्रमात आमदार करण देवतळे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे न्यायाची मागणी केली. या ‘जनसंवाद’ कार्यक्रमात आमदारांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पावसाळ्यात पायदळ चालणेही अशक्य

नंदोरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन या वडार शिवपांदन रस्त्यालगत आहे. मात्र, सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सचिन नारायण लांबट यांच्या शेतापासून ते गुलाब विष्णू ताजणे यांच्या शेतापर्यंतचा रस्ता पूर्णपणे चिखलमय आणि खचलेला राहतो. पावसाळ्यात या मार्गावरून बैलबंडी किंवा ट्रॅक्टर नेणे तर दूरच, साधे पायदळ चालणेही शक्य होत नाही.

शेती करणे धोक्यात; मुख्यमंत्र्यांच्या योजनेकडे डोळे

“आता शेतीची मशागत करायची वेळ आली आहे, मात्र रस्त्याअभावी खते आणि बियाणे शेतापर्यंत पोहोचवणे अशक्य झाले आहे. पुढे पिकवलेला माल बाजारात नेण्यासाठी अवाढव्य खर्च करावा लागणार आहे,” अशी तीव्र भीती मुख्य अर्जदार आकाश मोंढे व समस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाने ग्रामीण रस्ते बारमाही करण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना (२०२६)’ सुरू केली आहे. याच योजनेच्या माध्यमातून या रस्त्याचे खडीकरण किंवा काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे.

आमदारांकडे वैयक्तिक लक्ष देण्याची कळकळीची विनंती

शेतकऱ्यांनी आमदार करण देवतळे यांना साकडे घालत या गंभीर समस्येकडे स्वतः वैयक्तिक लक्ष द्यावे, अशी कळकळीची विनंती परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे. आमदार देवतळे यावर काय भूमिका घेतात आणि प्रशासनाला काय आदेश देतात, याकडे आता संपूर्ण शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

.      निवेदन सादर करताना आकाश मोंढे, गुरुदेव हरणे, रमेश तिखट, कैलास ढवस, पांडुरंग पावडे, देवराव अस्कर, केशव मोंढे, गणेश अस्कर, यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!