खासदार प्रतिभा धानोरकर यांची अध्यक्षांकडे आग्रही मागणी
शेतकऱ्यांसह वेकोली कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रशासनाचे आश्वासन
चंद्रपूर : वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोली) च्या विविध कोळसा खाण क्षेत्रांत गेलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन आणि वेकोली कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत खासदार प्रतिभा धानोरकर यांची नागपूर येथे वेकोलीचे अध्यक्ष तथा सहप्रबंधक संचालक यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी केली.
शिल्लक जमिनींचे तातडीने संपादन करा
या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या वणी क्षेत्रातील मौजा गाडेगाव, विरुर, खैरगाव, उकणी, बेलोरा, वणी नॉर्थ क्षेत्र तसेच कोलारपिंपरी, घोन्सा आणि बल्लारपूर क्षेत्रातील गौरी तसेच माजरी व एकोना परिसरातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रामुख्याने लावून धरला. या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोली प्रकल्पांतर्गत अद्यापही पूर्णपणे संपादित झालेल्या नाहीत. या शिल्लक राहिलेल्या जमिनी तातडीने संपादित करून संबंधित शेतकऱ्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
५ वर्षांची मुदत संपलेल्या विशेष प्रकरणांत पुन्हा संधी द्या
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलीने आधीच संपादित केल्या आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबातील आश्रितांना अद्यापही नियमानुसार नोकरी देण्यात आलेली नाही, अशा सर्व पात्र उमेदवारांना तातडीने वेकोलीमध्ये नोकरी देण्यात यावी, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी लावून धरली. त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलीने संपादित केल्या आहेत, परंतु ५ वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही काही घरगुती किंवा कौटुंबिक कारणास्तव त्यांच्या आश्रितांना नोकरी लागू शकली नाही, अशा विशेष प्रकरणांमध्ये प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी एकदा पुन्हा संधी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
कर्मचाऱ्यांचे प्रश्नही मार्गी लागणार
शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबतच, वेकोलीमध्ये रात्रंदिवस राबणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने त्यांच्या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वेकोली व्यवस्थापनाला सांगितले. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या आग्रही भूमिकेनंतर, वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या प्रशासनाने चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित समस्यांवर अत्यंत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.


