Home सामाजिक शेतकरी दिवसा शेतीत व्यस्त, प्रशासनाची रात्री ‘दौड’

शेतकरी दिवसा शेतीत व्यस्त, प्रशासनाची रात्री ‘दौड’

1

चंद्रपूर जिल्हाधिकारी व सीईओंचा थेट गावखेड्यात ‘लोकसंवाद’

खरीप हंगामामुळे प्रशासनाचा अनोखा पुढाकार

बोर्डा, घंटाचौकी, वलनी गावातील नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या

चंद्रपूर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गावखेड्यातील जनता सध्या शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे. त्यामुळे दिवसा गावातील नागरिकांची भेट होऊ शकणार नाही व त्यांच्याशी संवादही साधता येणार नाही, ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, थेट रात्रीच्या वेळी गावात पोहचले आणि लोकसंवादातून त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

.         जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी पंचायत समिती, चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत बोर्डा, घंटाचौकी व वलनी या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला व विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

घंटाचौकी येथे शाळा आणि अंगणवाडीचा आढावा

घंटाचौकी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीला भेट देऊन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शैक्षणिक व बालविकास उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच शाळा व अंगणवाडीत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने बचत गटांच्या महिलांशी संवाद साधत त्यांना स्वावलंबन, उद्योजकता व विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बोर्डाच्या सरपंचा पल्लवी तोडासे आणि चंद्रपूरच्या गटविकास अधिकारी संगिता भांगरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वलनी येथे आधुनिक शेती पद्धतीवर मार्गदर्शन

वलनी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन उपस्थित युवक व महिलांसोबत संवाद साधताना गावातील पाणीपुरवठा योजना, महिला बचत गट, उपजीविका विकास, कृषी व संलग्न व्यवसाय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती व शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

बोर्डा येथे आरोग्य सुविधा आणि वाचन संस्कृतीवर भर

बोर्डा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व सार्वजनिक वाचनालयाची पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविणे, आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणे व ग्रामविकासासाठी लोकसहभाग वाढविणे यावर भर देण्यात आला. यावेळी उपसरपंच दीपक खनके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद दृढ

लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होत असून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास या उपक्रमाची मोलाची मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी पंचायत समितीतील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली.

error: Content is protected !!