Home सामाजिक चंद्रपूर जिल्ह्यात ९०५ टीबी रुग्णांवर उपचार सुरू

चंद्रपूर जिल्ह्यात ९०५ टीबी रुग्णांवर उपचार सुरू

5

३४५ ग्रामपंचायती झाल्या ‘टीबीमुक्त’

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडून मोहिमेचा सविस्तर आढावा

२९० रुग्णांना लोकसहभागातून पोषण आहार वाटप

चंद्रपूर : “क्षयरोग (टीबी) हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. समाजातील क्षयरुग्णांप्रती असलेला भेदभाव दूर करून त्यांना सर्व शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, तसेच योग्य औषधोपचारांद्वारे जिल्हा क्षयमुक्त करणे हे आपले ध्येय आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित क्षयरोग दूरीकरण मोहिमेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात एकूण ९०५ रुग्णांवर योग्यरीत्या उपचार सुरू असून, ३४५ ग्रामपंचायती पूर्णपणे टीबीमुक्त झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

पोषण आहारासाठी ५६३ रुग्णांची सहमती
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत, जिल्ह्यातील ९०५ पैकी ५६३ रुग्णांनी पोषण आहार किट मिळण्यासाठी आपली सहमती दर्शविली आहे. यापैकी आतापर्यंत लोकसहभागातून २९० जणांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले असून, हे काम टप्प्याटप्प्याने निरंतर सुरू आहे. जिल्हाधिकारी पंत यांनी हा आहार रुग्णांच्या वयोमानानुसार देण्याच्या सूचना केल्या. तसेच ग्रामीण भाग, झोपडपट्ट्या व स्लम क्षेत्रांमध्ये विशेष शोध मोहीम राबवून वयोगटानुसार रुग्णांची माहिती अद्ययावत ठेवावी आणि गर्भवती महिला व लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

गतवर्षी १,०९५ रुग्ण झाले बरे
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले यांनी बैठकीत माहिती दिली की, जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नांमुळे गतवर्षी १,०९५ रुग्ण उपचाराने पूर्णपणे बरे झाले आहेत. या आढावा बैठकीत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, टीबीमुक्त ग्रामपंचायती, क्षयरुग्णांसाठीच्या सामाजिक योजना आणि सामाजिक संघटनांमार्फत मिळालेली मदत या विविध विषयांवर सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

.       या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ललित पटले, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, जागतिक आरोग्य संघटनेचे समन्वयक डॉ. संकेत नांदेकर, अशासकीय सदस्य प्रशांत विघ्नेश्वर आणि हरीश मंचलवार प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!