शिलभद्र मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभेचा संयुक्त उपक्रम
५० हून अधिक मुलांचा सहभाग
भद्रावती : शहरातील गौतम नगर येथील अशोका बुद्ध विहाराच्या प्रांगणात शिलभद्र मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय ‘बाल धम्म संस्कार शिबिरा’चा रविवारी (दि. ३१ मे) मोठ्या उत्साहात समारोप झाला. २७ ते ३१ मे या कालावधीत चाललेल्या या शिबिरात परिसरातील अनेक मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.
. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावतीचे शहर अध्यक्ष अचितराव करमनकर होते. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर तेलतुंबडे, कोषाध्यक्ष गुरुबालक मेश्राम, शहर अध्यक्ष भाऊराव दुर्योधन, केंद्रीय शिक्षिका कविता चांदेकर, समता सैनिक दलाचे लेफ्टनंट कर्नल प्रफुल भगत आणि शिलभद्र मंडळाचे अध्यक्ष भारत खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.
. या पाच दिवसीय शिबिराच्या माध्यमातून मुलांना वंदना, त्रिसरण, पंचशिलाचा मराठी अनुवाद, पंचांग प्रणाम यांचे वळण लावण्यात आले. तसेच सिद्धार्थ गौतमांचे बालपण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र, बौद्धांचे सण आणि मंगल दिन, आणि डॉ. बाबासाहेबांचा विद्यार्थ्यांना संदेश अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या शेवटच्या दिवशी सहभागी सर्व मुला-मुलींना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
. या शिबिरासाठी किशोर तेलतुंबडे, केंद्रीय शिक्षिका कविता चांदेकर, कविता खैरे आणि उषा तामगडे यांनी मार्गदर्शक म्हणून मोलाचे सहकार्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी शिलभद्र मंडळाचे अध्यक्ष भारत खोब्रागडे, अनिल बांबोडे, सागर कांबळे, प्रांजल कांबळे, सारिका पथाडे, हरिदास जवादे आणि राजेश चांदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.


