Home चंद्रपुर जिल्हा विशेष जिल्हाधिकारी थेट पेट्रोल पंपावर

जिल्हाधिकारी थेट पेट्रोल पंपावर

15

साठा रजिस्टरची तपासणी व ग्राहकांशी संवाद

चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

साठेबाजी व काळाबाजारी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची अचानक पाहणी

चंद्रपूर : पश्चिम आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जाणवू नये, ग्राहकांना नियमितपणे इंधन मिळावे तसेच साठेबाजी व काळाबाजारी रोखण्यासाठी आज जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी थेट पेट्रोल पंपावर धडक देऊन अचानक पाहणी केली. चंद्रपूर–नागपूर महामार्गावरील कोटपल्लीवार यांच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पंपावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी साठा रजिस्टर आणि दैनंदिन साठ्याबाबतच्या डिजिटल ॲपची प्रत्यक्ष तपासणी केली.

इंधन पुरवठ्यात सुधारणा, अफवांमुळे गर्दी

तपासणीदरम्यान पेट्रोलपंप चालक व्ही.एम. कोटपल्लीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली की, गत आठवड्याच्या तुलनेत सद्यस्थितीत मोठी सुधारणा झाली आहे. तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे टँकर नियमितपणे उपलब्ध होत आहेत. पंपावर इंधनाचा स्टॉक संपल्याची परिस्थिती सहसा निर्माण होत नाही; मात्र काही वेळा नागरिक अफवांमुळे अचानक गर्दी करतात, ज्यामुळे तात्पुरती अडचण निर्माण होते. तसेच औद्योगिक जिल्हा असल्याने बहुतांश मोठे ट्रक शहराबाहेरील पंपांवरून डिझेल भरतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी पंपावर कॅन किंवा प्लास्टिक बॉटलमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास सक्त मनाई केली. अशा प्रकारे खुली विक्री करणे पूर्णपणे अनधिकृत असल्याचे सांगत त्यांनी ते त्वरित थांबवण्याचे आदेश दिले. तसेच नागरिकांना इंधनाची अचूक माहिती मिळावी यासाठी दररोजचा उपलब्ध साठा दर्शवणारा फलक पंपाच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले. इंधनाचा कोणताही काळाबाजार किंवा अवैध साठेबाजी होणार नाही, याची प्रशासनाने काटेकोर दक्षता घ्यावी असे त्यांनी बजावले.

ग्राहकांशी थेट संवाद

या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पंपावर उपस्थित ग्राहकांशी थेट संवाद साधला. “टंचाईच्या भीतीमुळे तुम्ही वाहनात गरजेपेक्षा जास्त पेट्रोल भरत आहात का?”, “कधी पेट्रोल मिळाले नाही असे झाले आहे का?”, किंवा “कर्मचाऱ्यांकडून इंधन भरताना कपात केली जाते का?” अशी विचारणा करत त्यांनी ग्राहकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

जिल्ह्यातील इंधन साठा सुरक्षित (२४ मे २०२६ अखेर)

प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे. यात पेट्रोल  एकूण साठा ९,७८,५७१ लिटर होता, त्यापैकी २,२२,६५९ लिटर विक्री झाली असून ७,५५,९१२ लिटर साठा शिल्लक आहे. डिझेल एकूण साठा ११,०९,१६२ लिटर होता, त्यापैकी ४,२३,७६० लिटर विक्री झाली असून ६,८५,४०२ लिटर साठा शिल्लक आहे. एलपीजी सिलिंडर एकूण साठा १७,४४८ पैकी ६,५६७ सिलिंडरची विक्री झाली असून १०,८८१ सिलिंडर शिल्लक आहेत.

.     या धडक मोहिमेदरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, खरेदी अधिकारी राहुल वानखेडे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमेध चवरे आणि पेट्रोलपंप चालक व्ही.एम. कोटपल्लीवार आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!