चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई
अवैध पशुधन तस्करीच्या नेटवर्कला मोठा धक्का
जिल्हा प्रशासन, पोलीस आणि पशुसंवर्धन विभागाची संयुक्त मोहीम
चंद्रपूर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी अवैध गोहत्या आणि कत्तलीविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या सूचनेनुसार, गेल्या पाच वर्षांत नोंदवलेल्या प्रकरणांमधील आरोपींची एक विशेष परेड शनिवारी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तब्बल २७५ आरोपींना पोलीस लाईनमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेली ही कारवाई जिल्ह्यातील अवैध पशुधन तस्करीच्या नेटवर्कला मोठा धक्का मानली जात आहे.
![]()
नवीन कायद्यान्वये जामीनपत्र आणि कडक इशारा
पोलीस प्रशासनाने नवीन कायदेशीर तरतुदी, कलम १२६ आणि १२९ अन्वये, या आरोपींकडून जामीनपत्र (बॉंड) घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. “धार्मिक प्रसंगांच्या नावाखाली कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या किंवा अवैध कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिला आहे. तसेच, जर कोणत्याही आरोपीने जामीनपत्राच्या अटींचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर आर्थिक दंड आणि तुरुंगवासासह अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
३५० हून अधिक आरोपींवर गुन्हे दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गो-तस्करी आणि अवैध कत्तलीच्या ३५० हून अधिक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांपैकी २७५ जण शनिवारच्या संचलनात उपस्थित होते. इतर अनेक आरोपी सध्या दुसऱ्या जिल्ह्यांत आणि राज्यांमध्ये राहत असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. ही अनुपस्थिती संचलनाचा भाग नव्हती, असे पोलिसांनी स्पष्ट केले असून फरार व अनुपस्थित आरोपींविरुद्ध कारवाई सुरूच राहणार आहे.
३४ संवेदनशील ठिकाणी कडक नाकाबंदी
बकरीदच्या काळात जिल्ह्यात कोणताही अवैध प्रकार घडू नये आणि शांतता राहावी यासाठी पोलिसांनी व्यापक सुरक्षा उपाययोजना लागू केल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार, आंतरराज्यीय आणि आंतरजिल्हा सीमांसह जिल्ह्यातील ३४ संवेदनशील ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी पोलीस येणाऱ्या-जाणाऱ्या संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करत आहेत.


