आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार
“धनवान नव्हे, गुणवान व्हा”
‘मिशन ऑलिम्पिक’ अंतर्गत जिल्ह्यात अत्याधुनिक क्रीडा सुविधा व ग्रंथालयांचे जाळे
स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार स्मृती समर कॅम्पच्या समारोपात प्रेरणादायी मार्गदर्शन
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणातच नव्हे, तर क्रीडा, संस्कार आणि गुणवत्तेच्या बळावर जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवावा आणि २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या मातीतून ऑलिम्पिक पदकवीर घडावेत, असा निर्धार राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बल्लारपूर येथे आयोजित समर कॅम्पच्या समारोप सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हा संकल्प व्यक्त केला.
![]()
. यावेळी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, श्रीकांत आंबेकर व त्यांच्या संपूर्ण टीमने समाजसेवा आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा एक आदर्श उपक्रम उभा केला आहे. सेवाभाव आणि ध्येयवेड्या वृत्तीच्या जोरावर शहरातील गरजूंची सेवा करत विद्यार्थ्यांना गुणवंत घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मैदानाशी नाते जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या समर कॅम्पने केले असून देश प्रगतीपथावर न्यायचा असेल तर देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पाऊल पुढे पडले पाहिजे, असे ते म्हणाले.
‘मिशन ऑलिम्पिक’ आणि क्रीडा सुविधांचा विस्तार
या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी ‘मिशन ऑलिम्पिक’च्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात अत्याधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करण्याचे काम वेगात सुरू असल्याची माहिती आमदार मुनगंटीवार यांनी दिली. बल्लारपूर, मूल, पोंभूर्णा आणि चंद्रपूर येथे भव्य स्टेडियम उभारण्यात आले असून, येथील सैनिक शाळेतील स्टेडियम अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील क्रीडा गुणवत्तेला वाव देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सहा शाळा दत्तक घेऊन त्या ठिकाणीही उत्कृष्ट दर्जाच्या छोट्या स्टेडियमची निर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
थॉमस एडिसन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून प्रेरणा
कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती जिंकता येते, हे सांगण्यासाठी त्यांनी महान संशोधक थॉमस एल्वा एडिसन यांच्या जीवनातील संघर्षाचे उदाहरण विद्यार्थ्यांना दिले. तसेच, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचा उल्लेख करत त्यांनी शिक्षण आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. गरीब विद्यार्थ्यांना ज्ञानाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी बल्लारपूर, मूल, चंद्रपूर आणि पोंभूर्णा येथे वाचनालयांची निर्मिती करण्यात आली असून, मंत्रीपदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात २० ग्रंथालयांची कामे सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यशाचा मंत्र आणि संस्कारांची शिदोरी
“धनवान होण्यापेक्षा गुणवान व्हा,” हा जीवनमंत्र विद्यार्थ्यांना देत त्यांनी संस्कार, गुणवत्ता आणि मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले. “तुम्ही किती शिक्षण घेतले किंवा किती धनवान झालात, यावर माणसाचे खरे यश मोजले जात नाही. आई-वडील अभिमानाने ‘हा माझा मुलगा, ही माझी मुलगी आहे’ असे म्हणतील, यापेक्षा मोठे यश दुसरे नाही,” असे सांगत विद्यार्थ्यांनी आयुष्यात संस्कार, कर्तृत्व आणि माणुसकीची शिदोरी सोबत ठेवावी, असा संदेश आमदार मुनगंटीवार यांनी दिला व सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.


