Home सामाजिक चंद्रपूर जिल्ह्यात बकरी ईद शांततेत साजरी करण्यासाठी प्रशासन सज्ज

चंद्रपूर जिल्ह्यात बकरी ईद शांततेत साजरी करण्यासाठी प्रशासन सज्ज

22

कायदा व सुव्यवस्था राखण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सोशल मीडियावरील अफवांवर सायबर सेलची २४ तास नजर

गोमांस तस्करी रोखण्यासाठी आंतरराज्य सीमांवर नाकाबंदी

चंद्रपूर : पुढील आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात साजरी होणाऱ्या बकरी ईदच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभाग पूर्णपणे कटिबद्ध आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून सर्व सण आणि उत्सव आनंदात व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. नियोजन भवन येथे जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

.        या बैठकीला पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, सहाय्यक पोलिस अधीक्षक गौरव कायंदे पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, शांतता समिती व महिला दक्षता समितीचे सदस्य आणि पोलिस पाटील उपस्थित होते.

दुपारी विनाकारण बाहेर पडू नका: जिल्हाधिकारी

बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या की, सणादरम्यान शहरातील पाणी आणि वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची संबंधित विभागाने काळजी घ्यावी. तसेच पुढील काही दिवस चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उष्णतेचा इशारा (Heat Wave) देण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी सण साजरा झाल्यावर दुपारी कोणीही विनाकारण बाहेर पडू नये. सोशल मीडियावर कोणताही फेक किंवा नकारात्मक मेसेज दिसल्यास त्वरित सायबर टीमला कळवावे आणि वेळेवर फॅक्ट चेक करून अफवांना आळा घालावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

२४ तास सायबर गस्त आणि कडक बंदोबस्त: पोलिस अधीक्षक

जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी पोलिस प्रशासनाच्या तयारीची ग्वाही दिली. ईद निमित्त संपूर्ण जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, गोमांसची तस्करी रोखण्यासाठी आंतरजिल्हा व आंतरराज्य सीमेवर नाकाबंदी पॉईंट्स सुरू करण्यात आले आहेत. सोशल मीडियावरील अफवांवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर टीम २४ बाय ७ कार्यरत आहे. नागरिकांना काहीही संशयास्पद आढळल्यास त्यांनी त्वरित पोलिस विभाग किंवा ‘११२’ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. महापालिका आयुक्त अकुनूरी नरेश यांनी सांगितले की, शहरात नियमित पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून, कुर्बानीच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जाईल. या बैठकीचे संचालन पोलिस अंमलदार मंगला घागी यांनी केले.

शांतता समितीच्या सदस्यांनी मांडल्या महत्त्वपूर्ण मागण्या

या बैठकीदरम्यान शांतता समितीच्या सदस्यांनी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ईदच्या काळात शहरात अखंडित वीज आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा, तसेच कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी गर्दीच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी सदस्यांनी केली. गर्दीवर योग्य नियंत्रण ठेवतानाच, विघातक व असामाजिक तत्त्वांना गर्दीपासून दूर ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याशिवाय, सोशल मीडियावरील अफवा गांभीर्याने रोखणे, शहरातील पार्किंगचे योग्य व्यवस्थापन करणे आणि रस्त्यांवरील अवैध होर्डिंग्जवर तातडीने कारवाई करणे अशा विविध मागण्यांवर सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

error: Content is protected !!