Home सामाजिक महात्मा फुले २०० वी जयंती

महात्मा फुले २०० वी जयंती

39

काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर २० जाहीर सभा

राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नायगाव (सातारा) येथे होणार ऐतिहासिक सांगता

वर्ध्यापासून १८ जून रोजी रणशिंग फुंकणार

केंद्रीय नेते अशोक गेहलोत यांच्यासह देशभरातील प्रमुख ओबीसी नेत्यांना निमंत्रण

मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आगामी २०० व्या ऐतिहासिक जयंतीचे औचित्य साधून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात हा उत्सव अभूर्व उत्साहात साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व उत्सव समितीचे अध्यक्ष भानुदास माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महात्मा फुलेंचे विचार आणि त्यांचे महान कार्य जनमानसात प्रज्वलित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात वैचारिक प्रबोधनाचा एक भव्य आराखडा या बैठकीत तयार करण्यात आला आहे.

राष्ट्रीय व प्रांतीय नेतृत्वाचे लाभले मार्गदर्शन

या महत्त्वपूर्ण बैठकीत उत्सव समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस भानुदासजी माळी यांनी संपूर्ण महोत्सवाचे नेटके नियोजन व रूपरेषा मांडली. यावेळी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी, विदर्भाचे निरीक्षक तथा राजस्थानचे आमदार कुणाल चौधरी, आणि उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी उपस्थित राहून उत्सव समितीला अत्यंत मोलाचे व दिशादर्शक मार्गदर्शन केले. तसेच, देशाचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्यासह अनेक केंद्रीय नेत्यांना सोबत घेऊन हा जयंती उत्सव आणि महात्मा फुलेंचे कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा दृढ निश्चय या बैठकीत करण्यात आला.

वर्ध्यापासून रणशिंग फुंकणार; २० जाहीर सभांचे आयोजन

महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय व स्थानिक नेत्यांच्या प्रमुख २० जाहीर सभांचे भव्य नियोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण अभियानाची पहिली ठिणगी १८ जून रोजी वर्धा येथे पडणार आहे. उत्सव समितीचे अध्यक्ष भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखाली ही पहिली जाहीर सभा मुकुल वासनिक, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक रित्या पार पडेल.

नायगाव (सातारा) येथे होणार ऐतिहासिक सांगता सभा

या संपूर्ण अभियानाचा सुवर्णकलश क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (जिल्हा सातारा) येथे भव्य ‘सांगता सभेने’ होणार आहे. या महासभेसाठी देशाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते जननायक राहुलजी गांधी, ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत, मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्यासह देशभरातील प्रमुख ओबीसी नेत्यांना आमंत्रित करण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला.

प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती

या विचारमंथन बैठकीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले काँग्रेसचे प्रमुख शिलेदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने प्रदेश सरचिटणीस नंदकुमार सर्जेराव कुंभार, विजय राऊत (नाशिक), कांचनकुमार चाटे (छत्रपती संभाजीनगर), राजू घुटे (बुलढाणा), वसंत मुंडे (बीड), प्रदेश सचिव पांडुरंग कुंभार (धाराशिव), शंभू म्हात्रे (पनवेल), प्रदेश सचिव धनराज राठोड (नांदेड), सुरेश पाटील खेडे (ठाणे), अशोक खलाणे (जळगाव), दिपक गायकवाड (सांगली) यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष, इतर प्रमुख लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही बैठक अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. या भव्य आयोजनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महात्मा फुलेंच्या विचारांचे एक नवे वादळ निर्माण होणार, असा विश्वास सर्व नेत्यांनी याप्रसंगी व्यक्त केला

error: Content is protected !!