Home सामाजिक वरोरा येथील रुपेश कुत्तरमारे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

वरोरा येथील रुपेश कुत्तरमारे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

16

आनंद निकेतन महाविद्यालयात आनंदाचे वातावरण

राष्ट्रीय सेवा योजना आणि उल्लेखनीय समाजसेवेची दखल

३१ मे रोजी पुण्यात होणार गौरव सोहळा

वरोरा : समाजसेवा, युवकांमधील जनजागृती आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणारे वरोरा येथील युवक रुपेश कुत्तरमारे यांची प्रतिष्ठेच्या “महाराष्ट्र भूषण” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य फाउंडेशनच्या वतीने हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जाणार आहे. रुपेश यांच्या या यशामुळे वरोरा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

३१ मे रोजी पुण्यात वितरण
महाराष्ट्र राज्य फाउंडेशनतर्फे आयोजित हा राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा ३१ मे २०२६ रोजी पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन, येरवडा येथे संपन्न होणार आहे. या भव्य सोहळ्यात रुपेश कुत्तरमारे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाईल.

विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग
रुपेश कुत्तरमारे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचे मोठे कार्य केले आहे. त्यांनी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, ग्रामस्वच्छता, पर्यावरण जनजागृती, आरोग्य शिबिरे, मतदार जनजागृती, प्लास्टिकमुक्त अभियान तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन यांसारख्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. विशेष शिबिरांच्या माध्यमातून गावविकास आणि सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

यशाचे श्रेय मार्गदर्शक आणि पालकांना
आपल्या या यशाचे श्रेय रुपेश यांनी त्यांचे मार्गदर्शक आणि आई-वडिलांना दिले आहे. आनंद निकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मृणाल काळे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश राठोड, कार्यक्रम अधिकारी डॉ. धनश्री पंचभाई, प्रा. मोक्षदा नाईक, डॉ. रंजना लाड, डॉ. नरेंद्र पाटील, वाणिज्य शाखेतील सर्व शिक्षक, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. निरज आत्राम तसेच मुंडे सर यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

.       तसेच आपल्या यशामागे आई-वडिलांचे मोठे योगदान असल्याचे सांगत त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. पालकांच्या प्रेरणा, मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळेच सामाजिक कार्यात पुढे जाण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

भविष्यातही समाजहिताचा निर्धार
या पुरस्कारामुळे आपल्या सामाजिक कार्याला अधिक मोठी प्रेरणा मिळाली आहे, असे रुपेश यांनी सांगितले. भविष्यातही अशाच प्रकारे समाजहितासाठी निरंतर कार्य सुरू ठेवण्याचा दृढ निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे मित्रपरिवार, सामाजिक संस्था तसेच शहरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!