आ. सुधीर मुनगंटीवार यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे मागणी
‘पोंभूर्णा’ येथे नवे खरेदी केंद्र सुरू
५ हजार क्विंटलचे अपुरे उद्दिष्ट वाढवण्यासाठी आ. मुनगंटीवार यांचा थेट पत्राद्वारे पाठपुरावा
चंद्रपूर : जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. हंगाम २०२५-२६ (रब्बी) मधील मका खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी करत आ. मुनगंटीवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना थेट पत्र पाठविले आहे. जिल्ह्याचे उत्पादन लक्षात घेता शासनाने निश्चित केलेले केवळ ५ हजार क्विंटलचे उद्दिष्ट अत्यंत अपुरे असून ते किमान १ लाख क्विंटल करण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
२,०२२ शेतकऱ्यांची नोंदणी; १.६२ लाख क्विंटल उत्पादनाचा अंदाज
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे की, यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार २२ शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी अधिकृत नोंदणी केली असून मोठ्या प्रमाणावर मका उत्पादन होणे अपेक्षित आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या हंगामात जवळपास १ लाख ६२ हजार ८३८ क्विंटल मका उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या प्रचंड उत्पादनाच्या तुलनेत शासनाने दिलेले खरेदी उद्दिष्ट अत्यंत नगण्य आहे.
खाजगी व्यापाऱ्यांकडून लूट होण्याची भीती
सध्याचे ५ हजार क्विंटलचे अपुरे उद्दिष्ट कायम राहिल्यास जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना आपला मका खाजगी व्यापाऱ्यांकडे अत्यंत कमी दराने विकावा लागण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, अशी चिंता आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
केवळ भूमिका नाही, प्रत्यक्ष कृती: पोंभूर्णा येथे केंद्र सुरू
शेतकरी हितासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी म्हणून आ. सुधीर मुनगंटीवार यांची ओळख आहे. केवळ प्रश्न मांडण्यापेक्षा त्यावर प्रत्यक्ष कृती करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच नुकतेच पोंभूर्णा येथे शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळवण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या या नव्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील मका उत्पादकांमध्ये मोठी आशा निर्माण झाली आहे.


