Home सामाजिक आपत्ती काळात मूलभूत सुविधा व प्रशिक्षित मनुष्यबळाचे सूक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी...

आपत्ती काळात मूलभूत सुविधा व प्रशिक्षित मनुष्यबळाचे सूक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी वसुमना पंत

5

चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा

विजेपासून बचावासाठी ‘दामिनी’ ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन

चंद्रपूर : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे. आपत्तीच्या काळात नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक मूलभूत सुविधा, साधनसामग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचे सूक्ष्म नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व तयारी-२०२६ आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

.        जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात झालेल्या या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, कार्यकारी अभियंता अक्षय पगारे (सार्वजनिक बांधकाम), निलिमा मंडपे (मृद व जलसंधारण), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख तसेच विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) या बैठकीला जोडले गेले होते. बैठकीच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी मान्सूनपूर्व नियोजनाचा सविस्तर आढावा सादर केला.

नियंत्रण कक्ष आणि पायाभूत सुविधांची तपासणी

जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या की, सर्व विभागांनी आपल्याकडे उपलब्ध साधनसामग्रीचा साठा आणि त्यांची कार्यस्थिती तपासून घ्यावी. जिल्हा तसेच तालुका स्तरावर २४ तास कार्यरत राहणारे नियंत्रण कक्ष स्थापन करावेत. संबंधित अधिकाऱ्यांनी पूरप्रवण भागांची प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच धोकादायक इमारती, पूल व रस्त्यांची तपासणी करून त्यांच्या तातडीने दुरुस्तीचे नियोजन करावे. अपघात टाळण्यासाठी आपापल्या क्षेत्रातील अवैध होर्डिंग्ज त्वरित काढावीत आणि स्थानिक स्वयंसेवकांना प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण द्यावे. आवश्यकतेनुसार एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) यांच्याशी समन्वय ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

दुर्गम भागात अन्नधान्य पुरवठ्याचे नियोजन

जिल्ह्यातील वैनगंगा, वर्धा, पैनगंगा, इरई तसेच इतर लहान-मोठ्या नद्यांमुळे काही गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व यंत्रणांनी दक्ष राहून मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. जलद प्रतिसाद पथकांची तयारी, आपत्कालीन संपर्क यंत्रणा, वैद्यकीय सुविधा, पूरप्रवण भागातील उपाययोजना आणि जनजागृती मोहिमांवर विशेष भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जिल्ह्यातील दुर्गम भागात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास मदत, पुनर्वसन, जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचा पुरवठा तातडीने करण्यासाठी प्रशासन सक्षम राहील, अशा पद्धतीने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आदेश त्यांनी दिले. तसेच आपत्ती पूरप्रवण गावांत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवण्यास सांगितले.

मान्सूनपूर्व तयारीसाठी विविध विभागांना जबाबदाऱ्यांचे वाटप

या महत्त्वपूर्ण बैठकीत मान्सूनपूर्व तयारीच्या दृष्टीने विविध शासकीय विभागांकडे विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा, सर्पदंशावरील उपचार (अँटी-स्नेक व्हेनम) आणि आवश्यक लसींची उपलब्धता आधीच सुनिश्चित करावी, तर पोलीस विभागाने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपले प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात ठेवावे अशा सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने पूरबाधित होऊ शकणारे रस्ते व पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. जलसंधारण आणि लघु पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील नाले-बंधाऱ्यांची वेळेत स्वच्छता करून त्यातील गाळ काढावा आणि धरणे व कालव्यांची योग्य देखभाल करावी. महावितरण कंपनीला पावसाळ्यातील संभाव्य अपघात व धोके टाळण्यासाठी सर्व वीजवाहिन्यांची कडक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत निर्मिती केंद्राने (CSTPS) साठवण्यात आलेल्या इरई धरणाच्या पाण्याचा सुरक्षित निचरा करावा आणि धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेची कडक तपासणी करावी. यासोबतच कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी बियाणे, खतांचा पुरवठा आणि पेरणीपूर्व योग्य मार्गदर्शन करावे, तर जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे, नियंत्रण कक्ष आणि पूरप्रवण भागांचे समन्वित नियोजन करावे यावर सविस्तर चर्चा करून अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले.

.       शेवटी, पावसाळ्यात विजा पडण्यापासून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आणि स्वतःच्या बचावासाठी नागरिकांनी मोबाईलमध्ये ‘दामिनी’ (Damini) ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!