Home सामाजिक आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दणक्यामुळे पोंभूर्णा येथे मका खरेदी केंद्र अखेर सुरू...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दणक्यामुळे पोंभूर्णा येथे मका खरेदी केंद्र अखेर सुरू !

8

सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्याला यश

हमीभावाने मका खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

चंद्रपूर : मका उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत सातत्याने शासनाकडे पाठपुराव्यााचा धडाका लावणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दणक्यामुळे अखेर पोंभूर्णा येथील मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. हमीभावाने मका खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे आणि शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मनमानीपासून दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. त्यांच्या या ठाम पाठपुराव्यानंतर प्रशासनाने हालचाल करत पोंभूर्णा येथील केंद्र सुरू केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

खासगी व्यापाऱ्यांकडून लूट थांबणार
यंदा चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मक्याची लागवड झाली असून उत्पादनही चांगले झाले आहे. मात्र, शासनाची हमीभाव खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आपला मका कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आली होती. बाजारात मक्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण होते. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून साठवणुकीचा प्रश्नही गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न अत्यंत आक्रमकपणे शासनाकडे मांडत प्रशासनाला तातडीने निर्णय घेण्यास भाग पाडले. आ. मुनगंटीवार यांनी पत्रात खरेदी प्रक्रियेत झालेल्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली होती. “शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मिळालेच पाहिजे आणि त्यांना हमीभावाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला पाहिजे,” ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडली होती.

शेतकरी प्रश्नांचा प्रदीर्घ अभ्यास
विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण आणि परिणामकारक भूमिका घेणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीही धान, कापूस, सिंचन आणि कृषीविषयक अनेक प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधून त्यातून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पोंभूर्णा येथील मका खरेदी केंद्र सुरू होणे हे देखील त्यांच्या प्रभावी व वजनदार पाठपुराव्याचे आणखी एक महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जात आहे. यामुळे पोंभूर्णा परिसरातील शेतकऱ्यांनी मोठे समाधान व्यक्त करत आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात शुभारंभ
आज पोंभूर्णा येथे या मका खरेदी केंद्राचा रीतसर शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या सरचिटणीस अल्का आत्राम, तालुकाध्यक्ष हरीश ढवस, सुलभा पिपरे, बाजार समितीचे सभापती रवींद्र मरपेल्लीवार, विनोद देशमुख, ऋषी कोटरंगे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव, बाजार समितीचे सर्व संचालक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरेदी केंद्र सुरू झाल्याने आता शेतकऱ्यांना अधिकृत हमीभावाने मका विक्रीची हक्काची सुविधा उपलब्ध झाली असून, त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

error: Content is protected !!