Home चंद्रपुर जिल्हा विशेष विसापुरात एकाच रात्री फोडली दोन घरे

विसापुरात एकाच रात्री फोडली दोन घरे

5

८४ हजारांचा ऐवज लंपास

चोरांच्या धुमाकूळाने नागरिकांत भीतीचे वातावरण

बल्लारपूर : घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी एकाच रात्री दोन घरे फोडून ८४ हजार ८०० रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. ही घटना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे ८ मे रोजीच्या रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

.      मिळालेल्या माहितीनुसार, विसापूर येथील रहिवासी दशरथ तुराळे हे ८ मे रोजी आपल्या मुलासह मुलीकडे भद्रावती येथे गेले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक केली असता, तांदळाच्या डब्यात लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने आणि २२ हजार रुपये रोख त्यांच्या हाती लागले. येथून एकूण ६२ हजार रुपयांचा माल लंपास करण्यात आला.

.       एवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारी राहणाऱ्या बंडू तंवर यांच्या घराकडे वळवला. तंवर यांच्या घरातूनही चांदीचे दागिने आणि १५ हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. दोन्ही घरांमधून मिळून एकूण ८४ हजार ८०० रुपयांची चोरी झाली आहे.

.        विशेष म्हणजे विसापूर गावात पोलीस चौकी असूनही चोरट्यांनी धाडसाने ही घरफोडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी दशरथ तुराळे यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

error: Content is protected !!