Home चंद्रपुर जिल्हा विशेष गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करताना काळाचा घाला

गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करताना काळाचा घाला

8

विसापूर येथील सेवानिवृत्त शिक्षकाचे हृदयविकाराने निधन

सेवानिवृत्तीनंतरही मानधनावर देत होते सेवा

विनायक काळे यांच्या निधनाने विसापूर गावावर शोककळा

बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या निकालाचा आनंद साजरा होत असतानाच, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. आपल्या गुणवंत विद्यार्थ्याचा घरोघरी जाऊन सत्कार करत असताना, सेवानिवृत्त शिक्षक विनायक महादेव काळे (६०) यांची प्राणज्योत मालवली. निवृत्तीनंतरही केवळ विद्यार्थ्यांवरील प्रेमापोटी विद्यादानाचे कार्य करणाऱ्या या शिक्षकाच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय ?
शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. विसापूर येथील श्री चिंतामणी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाची परंपरा आहे की, शाळेतील शिक्षक गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करतात. यानुसार, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मुख्याध्यापक प्रशांत दोंतुलवार आणि अन्य शिक्षकांसह विनायक काळे हे परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थिनी लावण्या कैलास इंगोले हिच्या घरी गेले. तिचा सत्कार करून तिला पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन करत असतानाच काळे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. ते भोवळ येऊन पडणार इतक्यात सहकारी शिक्षकांनी त्यांना सावरले. त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

निवृत्तीनंतरही शैक्षणिक व सामाजिक वसा
विनायक काळे हे काही दिवसांपूर्वीच चिंतामणी महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. मात्र, त्यांचे दांडगे शैक्षणिक अनुभव आणि विद्यार्थीप्रियता पाहून शाळेने त्यांची सेवा मानधनावर सुरू ठेवली होती. ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी वर्षभर घडवले, त्यांच्या यशाचे कौतुक करतानाच त्यांना मृत्यूने गाठले. शैक्षणिक कार्यासोबतच ते धोबी, परिट, वरठी समाज मंडळाचे सक्रिय पदाधिकारी म्हणून सामाजिक कार्यातही अग्रेसर होते.

.       त्यांच्या पश्चात पत्नी उमा, मुलगी सिद्धी व रिद्धी असा मोठा परिवार आहे. विसापूर येथील तुकडोजी चौक परिसरात राहणाऱ्या एका कर्तव्यदक्ष शिक्षकाचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!